बॉलिवूड सुपरस्टार अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) काही दिवसांपूर्वी कोरोना पॉझिटिव्ह आले होते. याबाबतची माहिती त्यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवर दिली होती. दरम्यान आता त्यांची कोविड चाचणी निगेटिव्ह आली आहे. ही माहिती देखील त्यांनीच दिली आहे. तसेच त्यांनी पुन्हा कामाला देखील सुरूवात केल्याचे सांगितले आहे.
अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या अधिकृत अकाउंटवर लिहिले की, 'तुमच्या प्रार्थनेचा परिणाम म्हणजे काल रात्री कोविड चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर आजपासून ९ दिवसांचा आयसोलेट संपला आहे. मात्र ७ दिवस वेगळे राहणे बंधनकारक आहे. त्याबद्दल सर्वांचे आभार'. अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या चाहत्यांकडे मनापासून कृतज्ञता व्यक्त केली आहे. त्यांनी पुढे लिहिले की, 'सर्वांवर नेहमीप्रमाणे प्रेम. कारण तुम्ही सर्वजण नेहमी माझी खूप काळजी करता. मी तुम्हा सर्वांचे हात जोडून आभार मानतो.
सध्या अमिताभ बच्चन कौन बनेगा करोडपतीचा चौदावा सीझन होस्ट करत आहेत. सेटवर शूटिंग करताना ते खूप खबरदारी घेत होते. मात्र, आतापर्यंत अमिताभ बच्चन यांना कोरोना कसा झाला याबाबत माहिती मिळालेली नाही. कौन बनेगा करोडपती १४च्या सेटवर, अमिताभ बच्चन क्रू मेंबर्स व्यतिरिक्त अनेक स्पर्धकांच्या संपर्कात येतात, परंतु या दरम्यान संपूर्ण काळजी घेतली जाते आणि कोविड प्रोटोकॉल देखील पाळला जातो. असे असूनही त्यांना कोविडची लागण झाली.
याआधीही जुलै २०२० मध्ये बिग बी आणि मुलगा अभिषेक बच्चन, सून ऐश्वर्या राय आणि नात आराध्या बच्चन कोरोना पॉझिटिव्ह आले होते. वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, अमिताभ बच्चन यांचा 'ब्रह्मास्त्र पार्ट वन: शिव' हा चित्रपट याच महिन्यात रिलीज होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन अयान मुखर्जी करत आहे. याशिवाय त्याच्याकडे विकास बहलचा 'अलविदा', 'उंचाई' आणि 'प्रोजेक्ट के' देखील आहेत.