Join us

रितेश देशमुखने दिला शिवरायांनी दिलेल्या शिक्षेचा दाखला, 'चौरंग' शिक्षा काय आहे ?

By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2024 10:01 AM

बदलापूरमधील घटनेबाबत रितेश देशमुखने पोस्ट शेअर करत तीव्र शब्दांत संताप व्यक्त केला आहे. 

गेल्या काही दिवसांत देशातील महिला लैंगिक अत्याचाराच्या घटना समोर आल्या आहेत. कोलकाता येथील महिला डॉक्टरवरील बलात्कार आणि हत्येची घटना ताजी असताना बदलापूरमधील शाळकरी विद्यार्थिंनींवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना समोर आली आहे. संपुर्ण राज्यात बदलापूरमधील दोन चिमुकल्या विद्यार्थींनींवर लैंगिक अत्याचार झाल्याच्या घटनेने खळबळ उडाली आहे. याबाबत रितेश देशमुखने पोस्ट शेअर करत तीव्र शब्दांत संताप व्यक्त केला आहे. 

रितेश देशमुखने बदलापूरमधील घटनेचा निषेध नोंदवत शिवरायांनी दिलेल्या शिक्षेचा दाखला दिला आहे. रितेशने लिहलं, "एक पालक म्हणून मी पूर्णपणे  वैतागलोय, दुखावलोय आणि प्रचंड चिडलोय. दोन चार वर्षांच्या मुलींवर शाळेतील पुरुष सफाई कर्मचाऱ्याने लैंगिक अत्याचार केले.  शाळा ही मुलांसाठी त्यांच्या स्वतःच्या घरांइतकीच सुरक्षित जागा असायला हवी.या राक्षसाला कठोरात कठोर शिक्षा झालीच पाहिजे.  छत्रपती शिवाजी महाराज त्यांच्या काळात दोषींना 'चौरंग' शिक्षा द्यायचे.  हेच कायदे आपल्याला पुन्हा कृतीत आणण्याची गरज आहे".

 'चौरंग' शिक्षा काय आहे ?

शिवकाळात कुणीही गुन्हा केला, तरी स्वराज्यात त्याला पाठिशी घातले जात नव्हते. रांझे गावच्या (Ranje Village) बाबाजी ऊर्फ भिकाजी गुजर पाटलाने एका महिलेशी गैरवर्तन केले म्हणून त्याचा 'चौरंग' करण्याची शिक्षा छत्रपती शिवाजी महाराजांनी दिली होती. चौरंग म्हणजे, आरोपीचे दोन्ही हात आणि दोन्ही पाय कलम करणे.  इतिहासातला हा न्यायाचा (Shiv Chhatrapati Justice) दाखला रितेशने दिलाय.