आज सकाळी एक बातमी समोर आली आणि सर्वांना धक्का बसला. ती म्हणजे सध्या ट्रेंडींगवर असलेलं 'बदो बदी' गाणं युट्यूवरुन हटवण्यात आलंय. या गाण्याला युट्यूबवर १०० मिलियनपेक्षा जास्त व्ह्यूज होते. पण अखेर हे गाणं युट्यूबवरुन डिलीट करण्यात आलंय. त्यामुळे या गाण्याचे गायक चाहत फतेह अली खान यांना जबर धक्का बसला असल्याचं दिसतंय. त्यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालेत. यात चाहत फतेह अली खान प्रचंड भावूक झालेले पाहायला मिळत आहेत.
बदो बदी गाणं डिलीट झाल्याने गायक भावूक
'बदो बदी' गाण्याचे गायक चाहत फतेह अली खान यांचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या फोटोत गायक ढसाढसा रडताना दिसत आहेत. त्यांच्यासोबत असलेले मित्र त्यांना सावरताना दिसत आहेत. मित्राचा आधार घेऊन चाहत यांच्या डोळ्यांतून अश्रुंचा बांध फुटलेला दिसतोय. ज्या गाण्याला युट्यूबवर मिलियनच्या घरात व्ह्यूज आले ते गाणं असं अचानक डिलीट होणं, हा चाहत यांच्यासाठी मोठा धक्का असेल यात शंका नाही.
चाहत यांचं गाणं युट्यूबने का हटवलं?
चाहत फतेह अली खान यांचं 'बदो बदी' गाणं रिलीज झाल्यावर गाण्याला फारच निगेटिव्ह पब्लिसिटी मिळाली होती. सोशल मीडियावर या गाण्यावर विविध मीम व्हायरल झाले. भारत आणि पाकिस्तान दोन्ही देशात गाण्याची खिल्ली उडवली गेली. तर अनेकांनी यावर रील्सही बनवले. मात्र आता Youtube वर कॉपीराईट स्ट्राईक आल्यामुळे हे गाणं हटवण्यात आलं आहे. गाण्याला एका महिन्यातच युट्यूबवर 128 मिलियन पेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले. 'डेक्कन हेराल्ड'च्या रिपोर्टनुसार, गाण्याचे बोल हे नूरजहां यांच्या 1973 साली आलेल्या 'बनारसी ठग'मधील गाण्यावरुन घेण्यात आले होते. त्यामुळे जास्तीतजास्त कॉपीराईट स्ट्राईक आल्याने चाहत यांचं बदो बदी गाणं युट्यूबवरुन डिलीट करण्यात आलंय.