Join us

तामिळनाडूमध्ये ‘बाहुबली-२’चे शो रद्द; सिनेमागृहाबाहेर प्रेक्षकांचा हलकल्लोळ !

By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2017 8:21 AM

‘कटप्पाने बाहुबलीला का मारले?’ या प्रचंड आतुरता असलेल्या प्रश्नाचे उत्तर मिळविण्यासाठी देशभरातील प्रेक्षकांनी चित्रपटगृहाबाहेर गर्दी केली आहे. होय, आज ...

‘कटप्पाने बाहुबलीला का मारले?’ या प्रचंड आतुरता असलेल्या प्रश्नाचे उत्तर मिळविण्यासाठी देशभरातील प्रेक्षकांनी चित्रपटगृहाबाहेर गर्दी केली आहे. होय, आज ‘बाहुबली -२ कन्क्ल्युजन’ हा चित्रपट रिलीज झाला असून, प्रेक्षकांच्या तुफान गर्दीने बहुतेक चित्रपटगृहाबाहेर हाउसफुलचे फलक झळकत आहेत. अशात तामिळनाडूमध्ये ‘बाहुबली-२’च्या रिलीजमध्ये अडथळे निर्माण होत असल्याने सर्व शो रद्द करावे लागले आहेत. सध्या सिनेमागृहाबाहेर प्रेक्षकांनी हलकल्लोळ निर्माण केला आहे.  चेन्नईमधील प्रेक्षकांनी सकाळी ८च्या शोचे तिकिटे खरेदी केले होते. विशेष म्हणजे नियमित तिकिटाच्या रक्कमेपेक्षा जास्त रक्कम मोजून प्रेक्षकांनी हे तिकिटे खरेदी केले होते. त्यानुसार सकाळी ७ वाजेपासूनच चित्रपटगृहाबाहेर प्रेक्षकांनी हजेरी लावली होती. परंतु ८ वाजून गेले तरी शो सुरू केला गेला नसल्याने प्रेक्षकांचा पारा चढला. जेव्हा त्यांना सर्व मॉर्निंग शो रद्द केले गेल्याचे सांगण्यात आले तेव्हा मात्र प्रेक्षकांनी एकच हल्लाकल्लोळ निर्माण केला. अखेरीस पोलिसांना घटस्थळावर पाचारण करण्यात आले असून, सध्या याठिकाणी संतप्त वातावरण आहे.आर्थिक कारणांमुळे चित्रपटगृह चालकांना शो रद्द करण्याचा निर्णय घ्यावा लागल्याची माहिती समोर येत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ‘बाहुबली-२’  चे निर्माते अर्का मेडिवर्क्सकडून तामिळनाडूतील वितरक के. प्रॉडक्शनला १५ कोटी रु पये देणे बाकी आहेत. या कारणास्तव राज्यात तेलगू आणि तामिळ भाषेतील ‘बाहुबली -२’ रिलीज करण्यास अडथळे निर्माण झाले आहेत. मात्र प्रेक्षकांना हे ऐनवेळी सांगितले गेल्याने हा संपूर्ण गोंधळ निर्माण झाला आहे. दरम्यान, एका चित्रपटगृह चालकाने सांगितले की, या समस्येवर दुपारपर्यंत तोडगा निघण्याची शक्यता आहे. सर्व काही गोष्टी सुरळीत घडून आल्यास, दुपारनंतर तेलगू आणि तामिळ भाषेत चित्रपट रिलीज केला जाण्याची शक्यता आहे. मात्र ज्या प्रेक्षकांनी सकाळच्या शोचे तिकिटे खरेदी केली आहेत, त्यांना दुपारच्या शोमध्ये प्रवेश दिला जाईल काय? याबाबत साशंकता आहे. त्यामुळेच प्रेक्षकांनी सध्या गोंधळ निर्माण केला आहे. दरम्यान, सध्या ‘बाहुबली’च्या तिकिटांची दुप्पटीने विक्री केली जात आहे.