Pathaan Movie Controversy : बॉलिवुड अभिनेता शाहरुख खानच्या (Shahrukh Khan) आगामी पठाण सिनेमाचा वाद थांबण्याचे नावच घेत नाही. रोज पठाण संदर्भात काही ना काही नवीन घडामोडी घडत आहेत. आता नुकतेच पठाणचा विरोध म्हणून अहमदाबाद (Ahemdabad) मधील एका मॉलमध्ये राडा झाला. बजरंग दलाने (Bajrang Dal) पठाणचा कडाडून विरोध करत मॉलमध्ये तोडफोड केली.
पठाण सिनेमातील बेशरम रंग गाण्यावरुन हिंदू संघटना आक्रमक झाल्या आहेत.दीपिकाने भगवा बिकीनी घालत अंगप्रदर्शन केल्याने सिनेमाच बॉयकॉट करण्याची मागणी सुरु झाली. याचा विरोध दर्शवत काल बजरंग दलच्या कार्यकर्त्यांनी अहमदाबादच्या अल्फा मॉलमध्ये (Alpha Mall) तोडफोड केली. शेकडोच्या संख्येने कार्यकर्ते मॉलमध्ये दाखल झाले. मॉलच्या कर्मचाऱ्यांनी समजावण्याचा प्रयत्न केला पण कार्यकर्त्यांचा आक्रमक पवित्रा होता. अहमदाबादच्या अल्फा मॉलमध्ये असलेल्या थिएटर मध्ये हा हंगामा करण्यात आला. याठिकाणी शाहरुखच्या पठाणचे पोस्टर लावण्यात आले होते. ते पोस्टर लाथाबुक्क्यांनी फाडले. चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही अशा इशाराही यावेळी त्यांनी दिला. तसंच जय श्री राम चा जयघोष करण्यात आला.
'पठाण' सिनेमातून शाहरुख ४ वर्षांच्या ब्रेकनंतर मोठया पडद्यावर येतोय. त्यामुळे शाहरुखसाठी आणि त्याच्या चाहत्यांसाठी हा सिनेमा खूप खास आहे. यातील २ गाणी प्रदर्शित झाली आहेत त्यापैकी बेशरम रंग गाण्यामुळे वाद सुरु झाला आहे. तसंच मोठ्या प्रतिक्षेनंतर १० जानेवारी रोजी पठाणचे ट्रेलर रिलीज केलं जाणार आहे ज्याची चाहत्यांना उत्सुकता आहे.