Join us

'बजरंगी भाईजान' फेम अभिनेत्री सापडली मोठ्या आर्थिक संकटात; उपचारासाठीही नाहीत पैसे

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2021 18:27 IST

सध्या अभिनेत्री सुनीता शिरोळे एका अभिनेत्रीच्या घरी राहत आहेत.

कोरोनामुळे सिनेइंडस्ट्रीला मोठा फटका बसला आहे. त्यामुळे काही कलाकार कामे मिळत नसल्यामुळे आर्थिक संकटात सापडले आहेत. बजरंगी भाईजान फेम अभिनेत्री सुनीता शिरोळे यांना अर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यातच किडनीची समस्या उद्भवली असल्यामुळे त्यांना सातत्याने वैद्यकीय उपचार घ्यावे लागत आहेत. वाढत्या वैद्यकीय खर्चामुळे त्या आर्थिक अडचणीत सापडल्या आहेत. त्यामुळे तातडीने आर्थिक मदतीची गरज असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

अभिनेत्री सुनिता शिरोळे यांना किडनीचा आजार आणि गुडघेदुखीच्या समस्येमुळे त्यांना नुकतेच रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र रुग्णालयात उपचार घेत असताना रुग्णालयात त्या दोन वेळा पडल्या. यामुळे त्यांचा डावा पाय फ्रॅक्चर झाला. दुर्देवाने त्यांना या पायाची हालचाल करणेही अशक्य झाले आहे.

ईटाइम्सच्या रिपोर्टनुसार, सुनीता शिरोळे या सध्या अभिनेत्री नुपूर अलंकारच्या घरी राहत आहेत. सुनीता शिरोळे यांनी सांगितले की, सध्या मी पेईंग गेस्ट म्हणून राहत आहे. मात्र, गेल्या तीन महिन्यांपासून आर्थिक अडचणीमुळे या फ्लॅटचे भाडे मी देऊ शकलेले नाही. सिने अँड टिव्ही अर्टिस्ट असोसिएशने (CINTAA) नुपूरला मला मदत करण्यासाठी सांगितले, त्याबद्दल मी त्यांची आभारी आहे. त्यानंतर नुपूर मला तिच्या घरी घेऊन आली, तसेच माझी काळजी घेण्यासाठी आणि मदतीसाठी तिने एक पगारी नर्सदेखील ठेवली आहे.

पुढे त्यांनी सांगितले की, मी रुग्णालयात दोनदा पडले आणि माझा डावा पाय फ्रॅक्चर झाला. त्यामुळे मला हालचाल करता येत नाही. काही वर्षांपूर्वी माझी अँजिओप्लास्टी झाली आहे. तसेच मी इतर काही व्याधींचा सामना करते आहे. कोरोना येण्याच्या आधी मी कामे करत होते. त्यानंतरच्या काळात उपलब्ध सेव्हिंग हाच माझा आधार होता. मात्र दुर्दैवाने किडनी संसर्ग आणि तीव्र गुडघेदुखीमुळे मला रुग्णालयात दाखल व्हावे लागले. मी पुन्हा चालू शकेन की नाही हे मी सांगू शकत नाही. मला परत उभे राहण्यासाठी अर्थिक मदतीची गरज आहे.

सुनीता शिरोळे यांनी मराठीतील शापित तसेच हिंदीतील द लिजंड ऑफ भगतसिंग, बजरंगी भाईजान, मेड इन चायना या चित्रपटात काम केले आहे. याशिवाय त्यांनी किस देस मे है मेरा दिल, मिसेस कौशिक की पॉंच बहुए या मालिकेतही काम केले आहे.

टॅग्स :सलमान खान