आयुष्यमान खुराणा, यामी गौतम आणि भूमी पेडणेकर स्टारर ‘बाला’ने बॉक्सऑफिसवर अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. प्रदर्शनाच्या आधी ‘बाला’ अनेक वादात सापडला. चित्रपटाच्या मेकर्सवर अनेक आरोप झालेत. एकवेळ तर अशी आली की, चित्रपट प्रदर्शित होतो वा नाही, अशीही शंका यायला लागली. पण सगळ्या अडचणींवर मात करत ‘बाला’ प्रदर्शित झाला आणि या चित्रपटाने प्रेक्षकांना वेड लावले. रिलीजच्या पहिल्या दिवशी या चित्रपटाने 10 कोटी 15 लाखांची कमाई केली आहे. खरे तर पहिल्याच दिवशी हा चित्रपट दोन आकडी संख्या गाठेल ही अपेक्षा होतीच, कारण आयुष्मान खुराणाचे नाव चित्रपटाशी जोडलेले होते. झालेही तसेच.
दुस-या दिवशी या चित्रपटाने 15 कोटी 88 लाखांचा गल्ला जमवला. म्हणजेच दोन दिवसांत चित्रपटाने एकूण 25 कोटी 88 लाखांची कमाई केली. ट्रेड अॅनालिस्ट तरण आदर्श यांनी हे आकडे शेअर केले आहेत. आज तिसºया दिवशी हा चित्रपट 40 कोटींचा बिझनेस करेल, अशी अपेक्षा आहे.‘बाला’चा एकूण बजेट 25 कोटी होता. हा बजेट दोनच दिवसांत चित्रपटाने वसूल केला. याआधीच्या आयुष्यमानच्या ‘ड्रीम गर्ल’ ने पहिल्या दिवशी 10.05 कोटींची कमाई केली होती आयुष्मानचे अलीकडचे सहाही चित्रपट 100 कोटींच्या घरात गेलेले आहेत. ‘बरेली की बर्फी’पासून सुरु झालेली ही मालिका ‘शुभ मंगल सावधान’, ‘अंधाधुन’, ‘बधाई हो’, ‘आर्टिकल 15’ ते ‘ड्रीम गर्ल’ पर्यंत सुरूच आहे. आता बाला सुद्धा ही मालिका पुढे सुरु ठेवेल हीच त्याची अपेक्षा असेल.
अमर कौशिकने दिग्दर्शित केलेला हा चित्रपट स्वत:वर प्रेम करायला शिकवणारा आहे. अकाली आलेल्या टकलेपणाचा विषय घेऊन विनोदी पद्धतीने हा विषय मांडण्यात आला आहे. अमर कौशिकचा आधीच चित्रपट ‘स्त्री’ने सुद्धा 100 कोटींचा गल्ला जमवला होता.