बॉलिवूड अभिनेता आयुषमान खुराणा याला प्रयोगशील अभिनेता म्हणून ओळखले जाते. आयुष्यमान सध्या त्याच्या ‘बाला’ या आगामी सिनेमाच्या शूटींगमध्ये बिझी आहे. या चित्रपटाचे शूटींग सुरु झाल्याची घोषणा आयुष्यमानने नुकतीच केली होती. पण या घोषनेनंतर हा चित्रपट पुन्हा एकदा कायद्याच्या कचाट्यात सापडला आहे.होय, गत मार्चमध्ये सहाय्यक दिग्दर्शक कमलकांत चंद्रा यांनी आयुषमान खुराना, दिग्दर्शक अमर कौशिक आणि निर्माते दिनेश विजान यांच्यावर ‘बाला’साठी स्क्रिप्ट चोरल्याचा आरोप करत मुंबई हायकोर्टाचा दरवाजा ठोठावला होता. आता कमलकांत यांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. कोर्टाचा निर्णय येण्यापूर्वीच शूटींग सुरु केल्याचा केल्याचा आरोप करत त्यांनी कलम ४२०(फसवणूक) आणि कलम ४०६(विश्वासघात) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
काय आहे प्रकरणआयुष्यमानचा हा आगामी चित्रपट युवावस्थेत टक्कल पडण्याच्या समस्येवर आधारित आहे. पण सहाय्यक दिग्दर्शक कमल कांत चंद्रा यांनी ‘बाला’ची कथा चोरीची असल्याचा आरोप केला आहे. ‘बाला’चा लीड अॅक्टर आयुष्यमान खुराणा, निर्माता दिनेश विजन व दिग्दर्शक अमर कौशिक यांनी आपल्या ‘विग’ या चित्रपटाची कथा चोरल्याचा त्यांचाआरोप आहे. एका ताज्या मुलाखतीत कमल कांत यांनी या संपूर्ण प्रकरणाबद्दल माहिती दिली होती. ‘बरेली की बर्फी’च्या शूटींगदरम्यान मी आयुष्यमानला भेटलो होतो. यावेळी मी आयुष्यमानला ‘विग’ ची कथा ऐकवली होती. आयुष्यमानला कथा आवडल्यानंतर या कथेचा सार मी त्याला व्हॉट्सअप केला. तो वाचून आयुष्यमानने मला भेटायलाही बोलवले. पण मी भेटायला गेल्यावर आयुष्यमान बिझी असल्याचे कारण मला सांगितले गेले. यानंतर अनेकदा मी आयुष्यमानकडे या कथेबद्दल पाठपुरावा केला. पण त्याने उत्तर देणे बंद केले, असे त्यांनी म्हटले होते. या प्रकारानंतर कमल कांतने आयुष्यमान, दिनेश विजान व अमर कौशिक यांना कायदेशीर नोटीस पाठवले होते. पण तिघांनीही या नोटीसकडे दुर्लक्ष केले होते. यानंतर कमल कांतने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेत, तिघांविरोधात प्रकरण दाखल केले होते.