गायक-संगीतकार ए.आर.रहमान सध्या चांगलेच चर्चेत आहेत. ए.आर.रहमान यांनी त्यांच्या पत्नीशी घटस्फोट घेटला. रहमान आणि त्यांची पत्नी सायरा बानो लग्नानंतर २९ वर्षांनी एकमेकांपासून वेगळे झाले. रहमान यांच्या घटस्फोटामुळे सर्वांना धक्का बसला. घटस्फोटानंतर अवघ्या काहीच तासांमध्ये रहमान यांची सहकारी अन् गिटारिस्ट मोहिनी डेने सुद्धा घटस्फोटाची घोषणा केली. त्यामुळे रहमान आणि मोहिनी यांच्यामध्ये अफेअर असल्याच्या चर्चांना उधाण आलं. अखेर या सर्व चर्चांवर मोहिनीने मौन सोडलंय.
रहमान यांच्याशी अफेअरच्या चर्चांवर काय म्हणाली मोहिनी?
गिटारिस्ट मोहिनी डेने सोशल मीडियावर पोस्ट करुन लिहिलंय की, "ए.आर.रहमान आणि माझ्याविरोधात येत असणाऱ्या माहितीला कोणताही आधार नाही. हे चुकीचं आहे. मी एका लहान मुलाप्रमाणे ए.आर.रहमान यांच्यासोबत सिनेमा आणि संगीत टूरसाठी काम केलं. मी या गोष्टीचा खूप सन्मान करते. असा संवेदनशील गोष्टींमध्ये लोकांना समोरच्याविषयी कोणताही सन्मान किंवा सहानुभुती नाही याचं मला दुःख होतं. लोकांचे विचार बघून मला दुःख होतं. ए.आर.रहमान एक लिजंड आहेत. मी त्यांना कायम वडिलांच्या दृष्टीकोनातून बघत आलीय."
मोहिनीने पुढे लिहिलं की, "माझ्या आयुष्यात अनेक रोल मॉडेल आहेत. माझे वडीलही आहेत ज्यांनी माझ्या करिअरमध्ये अन् संगोपनामध्ये महत्वाची भूमिका निभावली आहे. माझे बाबा (ज्यांना मी एक वर्षांपूर्वी गमावलं) त्यांनी मला संगीताबद्दल सर्व काही शिकवलं. ज्यांनी माझी म्यूझिक इंडस्ट्रीशी ओळख करुन दिली. या इंडस्ट्रीत ए.आर.रहमान यांनी रेकॉर्डींग दरम्यान मला त्यांच्या शोमध्ये संगीताच्या माध्यमातून चमकण्याचं स्वातंत्र्य दिलं. मी कायम असंच करत राहीन. मला कोणालाही स्पष्टीकरण देण्याची आवश्यकता नाही परंतु माझ्या आयुष्याला या गोष्टी खराब करतील अशी माझी इच्छा नाही. त्यामुळे कृपया अशा गोष्टी पसरवू नका आणि आमच्या वैयक्तिक आयुष्याचा सन्मान ठेवा."