काहीच दिवसांपुर्वी सापाचं विष पुरवठा प्रकरणी एल्विशला पोलिसांकडून अटक करण्यात आली. एल्विश सध्या जामिनावर बाहेर आला आहे. अशातच एल्विशनंतर बिग बॉसचा विजेता मुनावर फारुकीला पोलिसांनी ताब्यात घेतलंय. पोलिसांनी आज मध्यरात्री मुंबईतील फोर्ट परिसरातील सबलान हुक्का बारवर छापेमारी केली. तेव्हा १३ लोकांना पोलिसांनी अटक केली असून या १३ जणांमध्ये मुनावर सुद्धा सहभागी असल्याचं समजतंय.
मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सबलान हुक्का बारच्या हुक्क्यांमध्ये बंदी असलेल्या तंबाखूचा वापर केला जात होता. पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर रात्री उशिरा त्यांनी बारवर छापा टाकला. त्यावेळी तिथे उपस्थित असलेले लोकं बंदी घातलेला तंबाखू असलेला हुक्का ओढत असल्याचं पोलिसांना जाणवलं. त्यामुळे पोलिसांनी बारमध्ये उपस्थित असलेल्या १३ जणांना ताब्यात घेतलं. त्यातच मुनावर सुद्धा असल्याचं समजतंय.
हर्बल हुक्क्याच्या नावाखाली बेकायदेशीर तंबाखूचे सेवन केल्याचा आरोप सिद्ध झाल्यास मुनावर आणि इतरांवर सिगारेट आणि इतर तंबाखू उत्पादने कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला जाऊ शकतो. दोषी आढळल्यास त्यांना मोठा दंड आणि तुरुंगवासाची शिक्षाही भोगावी लागेल. 2017 च्या कमला मिल्सच्या भीषण आगीनंतर ही बंदी लागू करण्यात आली होती. मुनावर आता बिग बॉसनंतर स्प्लीट्सव्हिला शोमध्ये सहभागी होणार आहे.