B'day Special : आजही गावी शेतीचे काम करतो नवाजुद्दीन सिद्दीकी, वाचा त्याचा बॉलिवूडपर्यंतचा प्रवास!
By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2018 2:22 PM
बॉलिवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी आता ४४ वर्षांचा झाला आहे. १९ मे १९७४ मध्ये उत्तर प्रदेशातील एका छोट्याशा कस्बे बुढाना ...
बॉलिवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी आता ४४ वर्षांचा झाला आहे. १९ मे १९७४ मध्ये उत्तर प्रदेशातील एका छोट्याशा कस्बे बुढाना या गावात जन्मलेल्या नवाजचा लूक हा सर्वसामान्य व्यक्तीप्रमाणे आहे. मात्र त्याच्यातील अभिनयाची कला चांगल्या चांगल्या अभिनेत्यांना मागे टाकणारी म्हणावी लागेल. जवळपास १५ वर्षांच्या संघर्षानंतर नवाजने बॉलिवूडमध्ये ओळख निर्माण केली आहे. एकेकाळी वॉचमॅन म्हणून काम करणारा नवाज आजही जेव्हा वेळ काढून गावी जात असतो तेव्हा आवर्जून शेतीची कामे करण्यास प्राधान्य देतो. नवाजने त्याच्या करिअरची सुरुवात १९९९ मध्ये आलेल्या ‘सरफरोश’ या चित्रपटातून केली. या चित्रपटात त्याची खूपच लहान भूमिका होती. त्यामुळे त्याच्या बॉलिवूड डेब्यूबद्दल कोणाला भनकही लागली नाही. २०१२ पर्यंत नवाजने बºयाचशा छोट्या-मोठ्या भूमिका केल्या. मात्र त्याला म्हणावी तशी ओळख मिळाली नाही. त्यानंतर अनुराग कश्यपने त्याला फैजल बनवूून ‘गॅँग्स आॅफ वासेपूर’मध्ये संधी दिली. फैजलची त्याची भूमिका इतकी हिट झाली की, तो रातोरात स्टार बनला. आज नवाज इंडस्ट्रीमध्ये प्रसिद्ध अभिनेत्यांच्या रांगेत उभा आहे. लोक तर त्याचा अभिनय बघून हा विचार करतात की, अखेर तो एवढा दमदार अभिनय कसा करतो? जेव्हा याविषयी एका मुलाखतीत नवाजला विचारण्यात आले तेव्हा त्याने सांगितले की, मी माझ्या गावी निघून जात असतो, त्याठिकाणी शेतीची कामे करतो. काही दिवस शेतीच्या कामात रमतो. नवाजच्या मते, असे केल्यास माझ्या मनाला आनंद मिळतो. त्यानंतर मी भूमिकेमध्ये एकजूट होण्याची तयारी करतो. नवाजच्या मते, आम्ही सात भाऊ आणि दोन बहिणी आहोत. वडील शेतकरी होते. घरात चित्रपटाचे नाव घेणेही शुभ समजले जात नव्हते. एकूण काय तर आयुष्यात संघर्ष एवढाच होता की, चित्रपटाबद्दल विचार करण्यासही वेळ मिळाली नाही. वास्तविक प्रत्येक आई-वडिलांप्रमाणे माझ्या वडिलांचीही इच्छा होती की, मी उच्चशिक्षण घ्यावे. मी नेमके कोणते शिक्षण घ्यावे हे त्यांना माहिती नव्हते, परंतु अंगी कला यावे असे शिक्षण घ्यायला त्यांचा नेहमीच आग्रह होता. त्यामुळे मी संघर्ष करीत हरिद्वारच्या गुरुकुल कांगडी विद्यापीठातून विज्ञान या विषयात पदवीचे शिक्षण पूर्ण केले. मात्र अशातही नोकरी मिळाली नसल्याने इकडे-तिकडे भटकत राहिलो. बडोद्यात एक पेट्रोकेमिकल कंपनी होती. ज्यामध्ये मी दीड वर्ष काम केले. ती नोकरी खूपच अवघड होती. कारण विविध प्रकारच्या घातक केमिकलचे टेस्टिंग करावे लागत असे. त्यामुळे मी ही नोकरी सोडली. त्यानंतर दिल्लीत आलो अन् नोकरीचा शोध घेऊ लागतो. पुढे वॉचमॅनचीही नोकरी केली. मात्र म्हणावे तसे काम मिळाले नाही. त्यानंतर एक दिवस मित्रासोबत नाटक बघायला गेलो. नाटक बघून खूपच आनंद झाला. त्यानंतर बरीचशी नाटके बघितले. हळूहळू रंगमंचाची जादू डोक्यात भिनू लागली. मग स्वत:च स्वत:ला म्हटले की, यार... ही ती गोष्ट आहे जी करण्याची माझी इच्छा आहे. काही काळानंतर एक ग्रुप ज्वाइन केला. साक्षी, सौरभ शुक्ला हेदेखील त्या ग्रुपशी जोडलेले होते. अशाप्रकारे नाटकांची आयुष्य जोडले गेले. मात्र थिएटरमध्ये पैसे मिळत नाहीत. त्यामुळे दररोजचा खर्च करणे अवघड झाले होते. एकवेळच्या जेवणाची सोय व्हावी म्हणून वॉचमॅनची नोकरी करण्यास सुरुवात केली. त्यानंतर बॉलिवूडकडे मोर्चा वळविला.