Join us  

Beast Movie Review: विजयच्या ॲक्शन सिक्वेन्सचा थ्रिलर 'बीस्ट'

By संदीप आडनाईक | Published: April 14, 2022 12:00 PM

Beast Movie Review: 'डाय हार्ड'पासून प्रेरणा घेतलेल्या या थ्रिलर 'बीस्ट'मध्ये नेल्सनने दिग्दर्शन आणि स्केलच्या बाबतीत मोठा प्रयोग करण्याचा प्रयत्न केला आहे.

चित्रपट परीक्षण : संदीप आडनाईक

दर्जा : २. ५ स्टारशैली : ॲक्शन, ड्रामाकलाकार: विजय, पूजा हेगडे, सेल्वा राघवन, व्हीटीव्ही गणेश आणि अंकुर विकदिग्दर्शक : नेल्सन

-------------'बीस्ट' (Beast Movie) चित्रपटासाठी चित्रपट निर्माते नेल्सन आणि अभिनेता विजय पहिल्यांदाच एकत्र आले आहेत. हा विजयचा सर्वांत स्टायलिश चित्रपट आहे. 'डाय हार्ड'पासून प्रेरणा घेतलेल्या या थ्रिलर 'बीस्ट'मध्ये नेल्सनने दिग्दर्शन आणि स्केलच्या बाबतीत मोठा प्रयोग करण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, केवळ कमकुवत लेखनामुळे या चित्रपटाची रंजकता कमी होऊ शकते. असे असले तरी विजयच्या ॲक्शन सिक्वेन्सने या थ्रिलर चित्रपटाने (हिंदीत रॉ) जान आणली आहे.

कथानक : हा चित्रपट काश्मीरजवळ सुरू होतो. वीरराघवन (विजय) हा 'रॉ'चा अधिकारी तीन महिन्यांपासून एका मिशनची तयारी करत आहे. शेवटच्या क्षणी, भारत सरकारने मिशन मागे घेण्याचा निर्णय घेतला, परंतु वीरने स्वतःच्या बॉसच्या आदेशाविरुद्ध मूळ योजनेनुसार मिशन पूर्ण करण्याचा निर्णय घेतला आहे. तो मिशन यशस्विपणे पार पाडतो, परंतु त्याचा परिणाम त्याच्या मानसिकतेवर होतो. मानसिकदृष्ट्या कमकुवत झालेल्या वीरला सेवा सोडण्यास भाग पाडले जाते आणि उपचारासाठी त्याला घरी परतावे लागते. काही महिन्यांनंतर, तो ओलीस ठेवलेल्या परिस्थितीत आढळतो. त्याच्या मैत्रिणीसह त्याला एका मॉलमध्ये अडकवून ठेवले जाते. वीराने पकडलेल्या दहशतवाद्यांच्या त्यांच्या नेत्याला सोडण्याची त्यांची मागणी असते. पुढे जो काही थरार होतो, तो प्रत्यक्ष पडद्यावर पाहणे मनोरंजक ठरेल.

दिग्दर्शन : 'कोलामावू कोकिला' आणि 'डॉक्टर' या दोन चित्रपटांमध्ये दिसलेल्या डार्क कॉमेडीचा वापर नेल्सनला यात ताकदीने करता आलेला नाही. याउलट यात त्याने केवळ विजयची स्टार प्रतिमा उंचावण्याच्या प्रयत्न केला आहे. नृत्यदिग्दर्शिनासह ॲक्शन सीक्वेन्स आणि उत्कृष्ट व्हिज्युअल्स हा या सिनेमाचा आकर्षक भाग आहे.

अभिनय : ॲक्शन सिक्वेन्सच्या गर्दीतही थलपति विजयने त्याच्या अभिनय करिश्माने सिनेमा खाऊन टाकला आहे. अर्थात इतर कलाकारांना फारसा वाव मिळालेला नाही. नाही म्हणता बॉलीवूडच्या पूजा हेगडेने छोट्याशा भूमिकेने लक्ष वेधले आहे.

एकूण : चित्रपट फार निराश करत नसला तरी एकसूरी झालेला आहे. ॲक्शन आवडणाऱ्या वर्गासाठी हा योग्य चित्रपट आहे.सकारात्मक बाजू : ॲक्शन, अभिनय, दिग्दर्शन, व्हिज्युअल्स

नकारात्मक बाजू : लेखन, संवाद. अपेक्षित डार्क कॉमेडीचा अभाव.

टॅग्स :पूजा हेगडे