गेल्या 15 मे रोजी बंगाली अभिनेत्री पल्लवी डे हिने आत्महत्या केली होती. तिच्या मृत्यूच्या धक्क्यातून चाहते सावरत नाही तोच आणखी एका लोकप्रिय अभिनेत्रीच्या मृत्यूची धक्कादायक घटना समोर आली आहे. बंगली अभिनेत्री व लोकप्रिय मॉडेल बिदीशा डे मजुमदार हिचा मृतदेह आढळून आला आहे. कोलकात्यातील नागरबाजारजवळ तिच्या राहत्या घरी ती मृतावस्थेत आढळून आली. अवघ्या 21 वर्षाच्या बिदीशा डे मजुमदार (Bidisha De Mujumdar) हिच्या मृत्यूच्या बातमीने बंगाली चित्रपटसृष्टी हादरली आहे.
बिदीशा आपल्या आई वडिलांसोबत भाड्याने एका अपार्टमेंटमध्ये राहात होती. बुधवारी बिदीशा आपल्या राहत्या घरी लटकलेल्या अवस्थेत आढळून आली. बिदीशाने आत्महत्या केली की ही हत्या आहे, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिसांनी प्रकरणाचा तपास सुरु केला आहे. पोलिस अभिनेत्रीच्या कुटुंबियांसोबतच तिच्या जवळच्या मित्र-मैत्रिणींचीदेखील चौकशी करत आहेत. ही आत्महत्या असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविला जात आहे. मात्र शविच्छेदन अहवालानंतरच सगळं काही स्पष्ट होणार आहे.
बिदीशा डे मजुमदार ही एक लोकप्रिय मॉडेल होती. मॉडेलिंग विश्वात तिचं मोठं नावं होतं. 2021 मध्ये अनिरबेद चटोपाध्याय दिग्दर्शित ‘भार: द क्लाऊन’ या शॉर्ट फिल्ममधून तिने अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवलं होतं. या शॉर्ट फिल्ममध्ये प्रसिद्ध बंगाली अभिनेता देबराज मुखर्जी मुख्य भूमिकेत दिसला होता.काही दिवसांपूर्वी बंगाली टीव्ही अभिनेत्री पल्लवी डे ही कोलकत्ता येथील गरफा भागातील तिच्या फ्लॅटमध्ये मृतावस्थेत आढळून आली होती आणि तिच्या रहस्यमय मृत्यू प्रकरणाचा पोलिस अजूनही तपास करत आहेत.