प्रसिद्ध गायक आणि संगीतकार अनुप घोषाल यांचं निधन झालं आहे. ते 77 वर्षांचे होते. गेल्याकाही दिवसांपासून ते आजारी होते. अनुप यांच्या निधनामुळे इंडस्ट्रीत शोककळा पसरली आहे. सोशल मीडियावर अनेक चाहते त्यांना श्रद्धांजली अर्पण करत आहेत.
पीटीआयच्या वृत्तानुसार, अनुप घोषाल यांनी १५ डिसेंबर रोजी कोलकाता येथे अखेरचा श्वास घेतला.अनुप यांच्या निधनाने त्यांच्या कुटुंबावर आणि चाहत्यांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध गायकांच्या यादीत अनुप घोषाल यांचे नाव नेहमीच समाविष्ट असेल. अनुप विशेषत: 1983 मधील अभिनेता नसीरुद्दीन शाह आणि अभिनेत्री शबाना आझमी अभिनीत 'मासूम' चित्रपटासाठी नेहमीच लक्षात राहितील.
अनुप यांनी चित्रपटातील तुझसे नाराज नही जिंदगी या गाण्याला आपला जादूई आवाज दिला. अनुप घोषाल यांचे हे गाणं आजही चाहत्यांच्या ह्रदयाच्या जवळ आहे. अनुप घोषाल राजकारणातही सक्रिय होते. 2011 मध्ये, अनुप यांनी तृणमूल काँग्रेसच्यावतीने पश्चिम बंगालमधील उत्तरपारा मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवली आणि ते विजयी झाले होते. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. अनुप घोषाल यांच्या मागे दोन मुली आहेत.