स्वप्नांची दुनिया, मायानगरी, चंदेरी दुनिया अशा किती तरी नावाने चित्रपटसृष्टीला ओळखलं जातं. या झगमगत्या दुनियेत करियर करण्याचं स्वप्न घेऊन अनेकजण येतात. त्यापैकी सगळ्यांनाच इथं झटपट यश मिळतं असंही नाही.कारण कोणतंही क्षेत्र असो त्यात स्ट्रगल कुणालाही चुकला नाही. मात्र अशा आव्हानात्मक परिस्थितीतही मेहनतीच्या जोरावर अनेक कलाकार सुपरस्टारपदावर पोहचले आहेत. रसिकांच्या गळ्यातील ते ताईत बनले आहेत.
करिअरच्या ऐन भरात असताना या कलाकारांना रसिकांचं प्रेम, अमाप लोकप्रियता आणि बक्कळ पैसाही मिळतो. मात्र याच चित्रपटसृष्टीची जशी चांगली बाजू तशी दुसरी बाजूही आहे. कारण इथं उगवत्या सूर्याला नमस्कार करण्याची प्रथा आहे. करिअर ऐन भरात असताना सेलिब्रिटींचं कौतुक होतं,प्रेम मिळतं. मात्र कालांतराने याच कलाकारांच्या उतारवयात किंवा पडत्या काळात कुणीच त्यांच्याकडे लक्षही देत नाही.अशी कित्येक उदाहरणं चित्रपटसृष्टीत आहेत ज्यांच्याकडे आपल्याच माणसांनी दुर्लक्ष केलं. यांत आणखी एका नावाची भर पडली आहे. एकेकाळच्या या प्रसिद्ध अभिनेत्री सविता बजाज हलाखीचं जीणं जगत आहे.
सविता बजाज या 79 वर्षाच्या आहेत. त्यांनी ५० पेक्षा जास्त सिनेमात काम केले आहे. 'निशांत', 'नजराना' 'बेटा हो तो ऐसा' या सारख्या सिनेमात सविता बजाज झळकल्या आहेत. सिनेमाव्यतिरिक्त 'नुक्कड़', 'मायका' आणि 'कवच' या सारख्या टीव्ही मालिकेतही त्यांनी काम केले आहे. टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी आपली आपबीती सांगितली आहे. अनेक गरजुंना मी आजपर्यंत मदत केली आहे. माझ्या उतारवयात माझे कुटुंबियही माझ्या जवळ नाही. बचत केलेली संपूर्ण जमापुंजीही संपली आहे.
काम सुटलं, नातेवाईक अन् इंडस्ट्रीनेही पाठ फिरवली. नियतीने त्यांच्यावर हलाखीचं जीणं जगण्याची वेळ आणलीय. चित्रपटसृष्टीत इतकं योगदान देऊनही आज त्याच चित्रपटसृष्टीला या अभिनेत्रीचा विसर पडला आहे. एकेकाळच्या या प्रसिद्ध अभिनेत्रीच्या अशा या हलाखीच्या परिस्थितीत कुणीही जवळचं नसल्याने एकट्याच राहत आहेत.