हेलेनच्या आयुष्यावर येणार होते बायोपिक़..पण सलीम खान यांनी केला हिरमोड!
By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2017 5:11 AM
हेलेन आजही बॉलिवूडची कॅब्रे क्विन मानली जाते. हेलेनच्या आयुष्यावर बायोपिक आले तर...? तर काय, लोकांना ते पाहायला नक्की आवडेल. ...
हेलेन आजही बॉलिवूडची कॅब्रे क्विन मानली जाते. हेलेनच्या आयुष्यावर बायोपिक आले तर...? तर काय, लोकांना ते पाहायला नक्की आवडेल. सलमान खान आपल्या प्रॉडक्शन हॉऊसअंतर्गत त्याची सावत्र आई अर्थात हेलेन हिच्यावर बायोपिक बनवणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून जोरावर आहे. या बायोपिकची पटकथा स्वत: सलीम खान लिहित असल्याचेही बोलले जात होते. केवळ इतकेच नाही तर, हेलेनच्या या बायोपिकमध्ये कॅटरिना कैफ हिची वर्णी लागणार असल्याची चर्चा होती. अर्थात सलीम खान यांनी मात्र ही चर्चा धुडकावून लावली आहे. ही एकदम चुकीची बातमी आहे. निश्चितपणे सलीम खान यांचा हा नकार लाखो चाहत्यांचा हिरमोड करणारा आहे. अलीकडे एका रिअॅलिटी शोमध्ये हेलेन आली असता, तिला तिच्या बायोपिकमध्ये कुण्या हिरोईनला पाहायला आवडेल, असा प्रश्न केला गेला होता. यावर हेलेनने अगदी क्षणाचाही विलंब न करता दीपिका पादुकोण हिचे नाव घेतले होते. सन १९८० मध्ये हेलनचा सलीम खान यांच्याशी विवाह झाला व ती त्यांची दुसरी पत्नी बनली. त्यांनी 'अर्पिता' नावाची एक मुलगी दत्तक घेतली.भारतीय दांपत्याच्या पोटी बर्मामध्ये (आजचे म्यानमार) जन्मलेल्या हेलनला रॉजर नावाचा एक भाऊ व जेनिफर नावाची एक बहीण आहे. दुसºया जागतिक महायुद्धादरम्यान तिच्या वडिलांचे निधन झाले. सन १९४३ मध्ये त्यांचे कुटुंब मुंबईस स्थलांतरित झाले. तिची आई परिचारिकेचे काम करीत होती. आईच्या तुटपुंज्या पगारात भागत नसल्यामुळे हेलनला नाईलाजाने शाळा बंद करून कुटुंबासाठी अर्थार्जन करणे भाग पडले. कुक्कू नावाची एक अभिनेत्री हेलनच्या कुटुंबाची मैत्रीण होती; तिच्यामुळे हेलनचे चित्रपटाच्या प्रांतात पदार्पण झाले. तिने हेलनला शबिस्तान व आवारा या चित्रपटात इ.स. १९५१ मध्ये, समूहनृत्यात एक काम मिळवून दिले. पुढे हेलनला अनेक भूमिका मिळाल्या.