Join us  

२५ खोल्यांचा बंगला असलेल्या 'या' प्रसिद्ध अभिनेत्याचं झालं चाळीत निधन; अनेक खस्ता खात घेतला अखेरचा श्वास

By ऑनलाइन लोकमत | Published: August 02, 2022 5:41 PM

Bhagwan dada: कलाविश्वात असे अनेक दिग्गज होऊन गेले ज्यांनी दिलेलं योगदान आजही साऱ्यांच्या लक्षात आहे. त्यातलंच एक नाव म्हणजे भगवान दादा.

बॉलिवूडचं साम्राज्य उभं करण्यामागे अनेक दिग्गज कलाकारांचा हात आहे. अनेक कलाकारांनी आपल्या अभिनयशैलीच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात अभिनयाचं बीज रोवलं. त्यामुळेच प्रेक्षकांना चित्रपट, संगीत यांसारख्या गोष्टींची गोडी लागली. कलाविश्वात असे अनेक दिग्गज होऊन गेले ज्यांनी दिलेलं योगदान आजही साऱ्यांच्या लक्षात आहे. त्यातलंच एक नाव म्हणजे भगवान दादा. इंडस्ट्रीमधील पहिले डान्सिंग आणि अॅक्शन हिरो म्हणून ते नावाजले गेले. मात्र, यश, संपत्ती, प्रसिद्धी सारं काही असूनही त्यांच्या जीवनाचं अंत दुर्दैवीपणे झाला.

भगवान दादा यांचं खरं नाव भगवान आबाजी पालव असं होतं. सुरुवातीच्या काळात मोलमजुरी करुन पोट भरणारे भगवान दादांना अभिनयाची विशेष आवड. भगवान दादा यांनी क्रिमिनल या मूकपटातून कलाविश्वात पदार्पण केलं. त्यानंतर १९३४ मध्ये हिंमत ए मर्दा हा त्यांचा पहिला चित्रपट रिलीज झाला. या चित्रपटातील त्यांचा अभिनय आणि संवादफेक कौशल्य यांच्यामुळे ते लोकप्रिय झाले.  असं एक एक करत त्यांनी अनेक सुपरहिट चित्रपट दिले. 

त्या काळात भगवान दादा सुपरस्टार म्हणून ओळखले जात.  प्रसिद्धी, पैसा त्यांच्या पायाशी लोळण घालत होता. त्या काळात त्यांच्याकडे लेटेस्ट डिझाइनच्या ७ कार होत्या. इतकंच नाही तर त्यावेळचे ते सर्वात श्रीमंत अभिनेता म्हणून ओळखले जायचे. परंतु, पडत्या काळात त्यांच्या या संपत्तीचा त्यांना काहीही उपयोग झाला नाही.

१९३१ ते १९९६ पर्यंत भगवान दादांनी काळ गाजवला. अभिनेता, दिग्दर्शक अशा अनेक जबाबदाऱ्या त्यांनी पार पाडल्या.  या काळात त्यांनी दिग्दर्शित केलेले अनेक चित्रपट गाजले. मात्र, हंसते रहना हा चित्रपट त्यांच्यासाठी अनलकी ठरला. या चित्रपटामुळे त्यांनी त्यांच्याकडचं सारं काही गमावलं. या चित्रपटासाठी त्यांनी सारं काही दावणीला लावलं होतं. अगदी बंगला, गाड्या सारं काही विकलं. पण हा चित्रपट फारसा यशस्वी ठरला नाही. घर, दार विकल्यामुळे भगवान दादांना शेवटी एका चाळीत रहावं लागलं.

तब्बल २५ खोल्यांच्या आलिशान बंगल्यात राहणारे भगवान दादा एका चाळीत राहू लागले. याच चाळीमध्ये त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि येथेच त्यांनी प्राण सोडले. परंतु, आजही भगवान दादा प्रेक्षकांच्या स्मरणात आहेत. इतकंच नाही तर अनेक चित्रपटांमध्ये आजही त्यांच्या डान्स स्टेप्स फॉलो केल्या जातात.

टॅग्स :सेलिब्रिटीसिनेमा