भाग्यश्रीचा आज वाढदिवस असून तिने मैंने प्यार किया या चित्रपटाद्वारे तिच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. या चित्रपटात तिने साकारलेली सुमनची भूमिका प्रेक्षकांना चांगलीच भावली होती.
भाग्यश्री ही एक मराठी मुलगी असून तिचे नाव भाग्यश्री पटवर्धन आहे. भाग्यश्रीचा जन्म सांगलीतील राजघराण्यात झाला असून तीन बहिणींमध्ये भाग्यश्री सगळ्यात मोठी आहे. मैंने प्यार किया या चित्रपटामुळे भाग्यश्री रातोरात स्टार बनली. ‘मैंने प्यार किया’ नंतर भाग्यश्रीला मोठ्या पडद्यावर पाहण्यास लोक उत्सुक होते. पण पहिल्याच चित्रपटानंतर भाग्यश्री बॉलिवूडमधून दिसेनासी झाली. खरे तर ‘मैंने प्यार किया’नंतर भाग्यश्रीकडे खूप मोठ मोठ्या ऑफर्स आल्या. पण भाग्यश्रीने त्या सगळ्या धुडकावून लावल्या आणि हिमालय दसानीसोबत ती लग्नबंधनात अडकली. लग्नानंतर तिने हिमालयसोबत काही चित्रपट केले. पण या चित्रपटांना प्रेक्षकांचा म्हणावा तितका प्रतिसाद मिळाला नाही.
हिमालय आणि भाग्यश्री यांची लव्हस्टोरी खूपच इंटरेस्टिंग आहे. भाग्यश्रीने तिच्या प्रेमकथेविषयी एका मुलाखतीत सांगितले होते की, मी आणि हिमालय लहानपणापासूनचे मित्र. आमच्या मैत्रीचे रूपांतर पुढे प्रेमात झाले. पण माझ्या घरच्यांना आमचे हे नाते मान्य नव्हते. त्यामुळे हिमालय शिक्षणासाठी अमेरिकेत गेला, त्यावेळी आम्ही ब्रेकअप केले. तो काळ माझ्यासाठी खूपच वाईट होता. हिमालय माझ्या आयुष्यात असणार नाही. माझे लग्न दुसऱ्या कोणासोबत होईल असे मला सतत वाटत होते. जवळजवळ दीड वर्षं आम्ही एकत्र नव्हतो. त्या काळाची आजही आठवण आली तरी अंगावर शहारा येतो. तो अमेरिकेत असताना मी ‘मैंने प्यार किया’ साईन केला. अर्थात हा चित्रपट साईन करण्याआधी मी हिमालयच्या आई-वडिलांची परवानगी घेतली होती.
कारण आज नसलो तरी उद्या मी आणि हिमालय सोबत असू, याची मला खात्री होती. हिमालयच्या घरच्यांना आमचे नाते मनापासून मान्य होते. अमेरिकेतील शिक्षण संपवून हिमालय भारतात परत आला. माझे कुटुंबीय तरीही आमच्या नात्याला स्वीकारायला तयार नव्हते. त्यामुळे मी हिमालयला फोन केला आणि हे नाते पुढे न्यायचे का? असा प्रश्न त्याला विचारला. मी घर सोडलेय, माझ्यावर प्रेम असेल तर मला घ्यायला ये, असे मी त्याला म्हटले. यानंतर पुढच्या पंधरा मिनिटांत हिमालय माझ्या घराबाहेर होता. आम्ही मंदिरात लग्न केले. हिमालयचे कुटुंब, सलमान आणि सूरत बडजात्या केवळ एवढेच जण आमच्या लग्नात हजर होते.
भाग्यश्रीने काही वर्षांपूर्वी लौट आओ त्रिशा या मालिकेत काम केले होते. आता ती ‘सीताराम कल्याण’ या कन्नड चित्रपटात झळकणार आहे. यानंतर ती ‘किट्टी पार्टी’ शिवाय ‘2 स्टेट्स’च्या तेलगू रिमेकमध्ये दिसणार आहे. इतकेच नाही तर प्रभाससोबतही एक सिनेमा तिने साईन केला आहे. या चित्रपटाचे नाव ‘प्रभास 20’ असल्याचे कळतेय. याशिवाय एका हिंदी सिनेमातही तिची वर्णी लागली आहे.