१९८९ साली ‘मैंने प्यार किया’ रिलीज झाला आणि चित्रपट ब्लॉकबस्टर ठरला. या सिनेमात भाग्यश्रीने रंगवलेली सुंदर, सौज्वळ सुमन प्रेक्षकांना भावली. चित्रपटातील तिच्या अभिनयाचेही खूप कौतुकही झाले. पण अचानक भाग्यश्रीने लग्नाचा निर्णय घेतला आणि ‘सुमन’च्या करिअरला ब्रेक लागला. विवाहबंधनात अडकल्यानंतर तिने तीन चित्रपट केलेत आणि यानंतर अभिनयातून ब्रेक घेतला. नाही म्हणायला २००१ साली तिने पुन्हा कमबॅक केले. पण छोट्या-मोठ्या भूमिकांपलीकडे तिच्या वाट्याला काहीच आले नाही. आता ती प्रभासच्या राधेश्याम या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.
भाग्यश्रीला ‘मैंने प्यार किया’या चित्रपटामुळे प्रचंड लोकप्रियता मिळाली होती. पण तुम्हाला माहितेय का, या चित्रपटात काम करण्यासाठी भाग्यश्रीने सुरुवातीला नकार दिला होता. भाग्यश्रीनेच नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत याविषयी सांगितले आहे. भाग्यश्री सांगते, मी या चित्रपटात काम करण्यास नकार दिला होता असे ऐकल्यावर आजची पिढी मी वेडी तर नव्हती ना... असा विचार करेन. पण खरंच मला या चित्रपटात काम करायचे नव्हते. मला परदेशात जाऊन उच्चशिक्षण घ्यायचे होते आणि त्यासाठी मी प्रवेशप्रक्रिया देखील पूर्ण केली होती. पण मी भारतातच शिक्षण घ्यावे असे माझ्या वडिलांचे म्हणणे होते.
आमच्या घरात माझ्या शिक्षणाच्या बाबतीत चर्चा सुरू असतानाच मला मैंने प्यार किया विषयी विचारण्यात आले. मला चित्रपटात कामच करायचे नाही असे मी सुरजजी (सुरज बडजात्या) यांना सांगितले होते. त्यांनी मला या चित्रपटाची पटकथा ऐकवल्यावर मी या पटकथेच्या प्रेमात पडले होते. पण तरीही मी चित्रपटाला नकारच देत होते. त्यांनी सात वेळा कथेत थोडे बदल करून मला ही कथा ऐकवली, जेणेकरून मी या चित्रपटासाठी होकार देईन. पण प्रत्येकवेळी मी त्यांना नाही हेच उत्तर द्यायची. दरवेळेला मी काही ना काही तरी सांगून टाळत होते. अखेर आठव्यांदा कथा ऐकल्यावर मी या चित्रपटासाठी होकार दिला.