बॉलिवूडची लोकप्रिय लाफ्टर क्वीन म्हणजे भारती सिंह (Bharti Singh). आपल्या विनोदबुद्धीच्या जोरावर आजपर्यंत भारतीने प्रेक्षकांचं निखळ मनोरंजन केलं आहे. ३ एप्रिल रोजी भारतीने एका चिमुकल्या मुलाला जन्म दिला. त्यामुळे सध्या सोशल मीडियावर या बाळाची जोरदार चर्चा रंगली आहे. यामध्येच सध्या एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. यात अभिनेता सलमान खान याने भारतीच्या बाळाला बॉलिवूडमध्ये लॉन्च करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता आणखी एक स्टारकिड कलाविश्वात पदार्पण करणार का? असा प्रश्न नेटकऱ्यांना पडला आहे.
सध्या सोशल मी़डियावर व्हायरल होत असलेला व्हिडीओ भारतीच्या प्रेग्नंसी काळातील असून तो तीन महिने जुना आहे. या व्हिडीओमध्ये भारती आणि पती हर्ष लिंबाचिया (Haarsh Limbachiyaa) यांनी बिग बॉस 15 (Bigg Boss 15) मध्ये हजेरी लावली होती. त्यावेळी विनोद करताना माझ्या मुलाला बॉलिवूडमध्ये तुम्ही लॉन्च कराल का? असा प्रश्न भारती विचारते. त्यावर सलमान तिला होकार देतो.
नेमकं काय आहे या व्हिडीओमध्ये
सलमान खानच्या बिग बॉस 15 (Bigg Boss 15) या रिअॅलिटी शोमध्ये भारती आणि हर्ष त्यांच्या हुनरबाज या कार्यक्रमाचं प्रमोशन करण्यासाठी गेले होते. यावेळी आमच्या मुलाला बॉलिवूडमध्ये लॉन्च कराल ना? असा मजेशीर प्रश्न भारतीने सलमानला विचारला. तसंच करण जोहरने तर नकारच दिला, असंही तिने सांगितलं.
"तुमचे खूप सारे आशीर्वाद आमच्या बाळासाठी हवे आहेत आणि तुमचं फार्म हाऊस सुद्धा हवंय. बाळाच्या बेबीशॉवरसाठी...सर मिळेल ना?" त्यावर सलमान म्हणतो, 'नक्कीच'. सलमानचा होकार ऐकल्यावर "सर, आम्हाला आमच्या बाळाला लॉन्च करायचं आहे. पण करण जोहर सरांनी तर तोंडावर नाही सांगितलं. त्यामुळे सर, तुम्ही आमच्या बाळाला लॉन्च कराल ना?" असं भारती विचारते. त्यावर, 'नक्कीच तुमच्या बाळाला मी लॉन्च करेन', असं सलमान म्हणतो.
दरम्यान, हा सगळा मजेचा भाग होता. मात्र, आता भारतीने तिच्या बाळाला जन्म दिल्यानंतर हा व्हिडीओ चांगलाच चर्चेत आला आहे.भारतीने २०१७ मध्ये हर्ष लिंबाचियासोबत लग्न केलं. जवळपास ७ वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर त्यांनी लग्नगाठ बांधली.