लॉकडाऊनमुळे अनेक व्यवसाय ठप्प झाले होते. चित्रपटाचे चित्रीकरण कित्येक महिने होत नव्हते. चित्रीकरण होत नसल्याने छोट्या-मोठ्या भूमिका साकारणारे कलाकार, तसेच तंत्रज्ञ यांचे बरेच हाल झाले. पण पैसे नसल्याने एक अभिनेता चक्क वाईट मार्गाला लागला असून खोट्या नोटा बनवण्याच्या प्रकरणात त्याला अटक करण्यात आली आहे.
भोजपूरी इंडस्ट्रीतील एका अभिनेत्याक़़डून 50 लाख रुपयांच्या खोट्या नोटा मिळाल्या आहेत. यात दोन हजार, पाचशे, दोनशे, शंभर आणि पन्नासच्या नोटांचा समावेश आहे. हा व्यक्ती भोजपूरी चित्रपटात काम करत होता. पण लॉकडाऊनमध्ये चित्रीकरण थांबल्याने त्याला चित्रपट मिळत नव्हते. त्यामुळे त्याने गाड्या चोरायला सुरुवात केली. त्यानंतर अधिक पैसा कमवण्याच्या हेतूने त्याने खोट्या नोटा छापायला सुरुवात केली.
पोलिसांनी या अभिनेत्याला खोट्या नोटांसमवेत दिल्ली येथील न्यू फ्रेंड्स कॉलनी येथून ताब्यात घेतले. न्यू फ्रेंड्स कॉलनी येथून एका स्कूटीवरून हा अभिनेता त्याच्या मित्रासोबत जात होता. पोलिसांनी स्कूटी अडवली असता त्यांच्याकडे स्कूटीचे पेपर नव्हते. ही स्कूटी चोरीची असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. पोलिसांनी केलेल्या चौकशीत हा अभिनेता खोट्या नोटा छापत असल्याचे लक्षात आले.