कलाविश्वातील अनेक अभिनेत्री आणि महिलांनी #MeToo या मोहिमेअंतर्गत त्यांच्यावर झालेल्या अन्यायाला वाचा फोडली आहे. अनेक जणींनी त्यांच्यावर झालेल्या लैंगिक अत्याचार, शोषण यांच्यावर उघडपणे भाष्य केलं. त्यानंतर आता एका प्रसिद्ध भोजपुरी अभिनेत्री प्रियांशू सिंह हिने तिच्या खासगी आयुष्याविषयी मोठा खुलासा केला आहे. प्रियांशूने तिच्या सहअभिनेता आणि बॉयफ्रेंड पुनीत सिंह याच्यावर लग्नाचं आमिष दाखवून शारीरिक शोषण केल्याचा आरोप केला आहे.
प्रियांशूने नुकतीच एक मुलाखत दिली या मुलाखतीमध्ये तिने पुनीतविषयी अनेक खुलासे केले. सोबतच तिने त्याच्याविरोधात पोलिस तक्रार दाखल केल्याचंही म्हटलं आहे.
"आपण लग्न करु असं पुनीत सतत मला म्हणायचा. नंतर मला दारू पाजून माझं शारीरिक शोषण करायचा आणि मग पुन्हा दुसऱ्या दिवशी माझी माफी मागायचा. ज्यावेळी मी त्याला पोलिसांकडे तक्रार करेन असं सांगितलं तेव्हा आपण कुटुंबियांना आपल्या नात्याबद्दल सांगुयात असं म्हणाला. आपण दोघं एकाच जातीमधील असल्यामुळे कुटुंबीय आपल्या नात्याच्या विरोधात जाणार नाही", असं तो सतत म्हणायचा, असं प्रियांशू म्हणाली.
पुढे ती म्हणते, "भोजपुरी इंडस्ट्रीमध्ये काम मिळावं यासाठी पुनीतने माझ्याशी मैत्री केली होती. मी मदतीचं आश्वासन दिल्यापासून त्याने माझा गैरफायदा घ्यायला सुरुवात केली. २०२१ पासून तो माझं शारीरिक शोषण करतोय." दरम्यान, प्रियांशू तिच्या बहिणीसोबत मुंबईत राहते. पुनीत तिच्या बहिणीच्या घरी जेवायला यायचा. त्यामुळे या दोघांची मैत्री झाली. ज्यावेळी प्रियांशूची बहीण घरी नसायची त्यावेळी पुनीत त्यांच्या घरी दारु पिऊन यायचा. पुनीतविरोधात कलम 376 आणि 377 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रियांशु सिंह ही भोजपुरी फिल्म इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे.