सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येच्या धक्क्यातून चाहते अद्यापही सावरलेले नाहीत. सुशांत दीर्घकाळापासून डिप्रेशनमध्ये होता आणि याचमुळे त्याने आत्महत्या केली, असे मानले जात आहे. अशात भोजपुरी सिनेमाची लोकप्रिय अभिनेत्री राणी चॅटर्जी हिने तिच्या डिप्रेशनबद्दल धक्कादायक खुलासा केला आहे. मी खूप दिवसांपासून डिप्रेशनमध्ये आहे. एका व्यक्तिमुळे मी त्रासले आहे, असा खुलासा तिने केला आहे. विशेष म्हणजे, त्रास देणा-या या व्यक्तिचे नाव उघड करत तिने मुंबई पोलिसांकडे मदतीची विनंती केली आहे. केवळ इतकेच नाही तर मी आत्महत्या केलीच तर माझ्या आत्महत्येसाठी केवळ तोच जबाबदार असेल, असेही तिने म्हटले आहे.
राणीची पोस्टमी खूप डिप्रेशनमध्ये आहे आणि आता प्रचंड डिर्स्टब झाले आहे. मी सतत स्ट्रॉन्ग व पॉझिटीव्ह राहण्याचा प्रयत्न करतेय, पण आता माझ्यासाठी ते शक्य नाही. हा माणूस अनेक वर्षांपासून माझ्याबद्दल घाणेरड्या गोष्टी सोशल मीडियावर लिहितोय. मी खूप दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न केला. पण मी पण एक माणूस आहे. मी जाड आहे, म्हातारी आहे, मला काम नाही, असे काय काय तो लिहितो.
लोक मला त्याचे मॅसेज फॉरवर्ड करतात आणि दुर्लक्ष करण्यास सांगतात. पण आता माझ्या सहनशक्तीची मर्यादा संपली आहे. मी आता थकलेस, निराश झालेय. मी आत्महत्या करावी, असेच त्याला वाटतेय. मुंबई पोलिसांना माझी विनंती आहे की, मी जीवाचे बरे वाईट केल्यास, त्याला हा व्यक्ती जबाबदार असेल. मी सायबर सेलकडेही याबाबत तक्रार नोंदवली होती. पण यात तुमचे नाव नाही, असे मला सायबर सेलकडून सांगण्यात आले. पण मला माहितीये, त्याचे मॅसेज माझ्यासाठीच आहेत. आता माझ्यात जराही हिंमत नाही. वाटतेय, मी आत्महत्या करावी. कारण मी अनेक वर्षांपासून डिप्रेशनमध्ये आहे, असे राणीने तिच्या पोस्टमध्ये लिहिले आहे.