बिग बॉस या रिअॅलिटी शोमुळे चर्चेत आलेली अभिनेत्री म्हणजे संभावना सेठ (Sambhavna Seth). भोजपुरी सिनेसृष्टीपासून करिअरची सुरुवात करणारी संभावना सोशल मीडियावर चांगलीच सक्रीय आहे. त्यामुळे अनेकदा प्रोफेशनल लाइफसोबत ती तिच्या पर्सनल आयुष्याविषयीदेखील भाष्य करते. अलिकडेच संभावनाने तिच्या आरोग्याविषयी एक व्हिडीओ शेअर केला असून यात ती एका गंभीर आजाराचा सामना करत असल्याचं सांगितलं.
संभावना गेल्या काही काळापासून आई होण्यासाठी प्रयत्न करत आहे. त्यामुळे तिने आयव्हीएफचा (IVF) आधार घेतला होता. साधारणपणे तीन वेळा तिने आयव्हीएफ केलं. मात्र, तिच्या पदरी निराशा पडली. इतकंच नाही तर या ट्रिटमेंटदरम्यान, तिला एक गंभीर समस्या असल्याचंही समोर आलं. संभावनाने तिच्या युट्यूब चॅनेलवर एक व्हिडीओ शेअर करत ही माहिती दिली आहे.
संभावनाला रूमेटाइड अर्थराइटिस (rheumatoid Arthritis) हा आजार झाला असून त्याच्यामुळे तिला चालणं, उठणं-बसणंदेखील कठीण झालं आहे. या आजारामुळे तिच्या हातापायांना सूज आली असून त्यात प्रचंड वेदना होतात. इतकंच नाही तर तिचं वजनदेखील झपाट्याने वाढत आहे. या आजारपणाविषयी सांगत असताना संभावनाला अश्रू अनावर झाले आणि ती कॅमेरासमोरच रडू लागली.
“माझ्या मागे सतत काही ना काही संकट येत असतात. एक चांगली घटना घडली की लगेच एखादं संकट समोर उभं राहतं. मला माझ्या पतीचं अविनाशचं खूप जास्त वाईट वाटतं. माझ्यामुळे त्यालाही हे सगळं सहन करावं लागतंय. आयव्हीएफमुळे पुन्हा एकदा मला या गंभीर आजाराचा सामना करावा लागत आहे", असं संभावना म्हणाली.
पुढे ती म्हणते, "मुल हवं मी कित्येक वेळा आयव्हीएफ केलं. पण माझे सगळे प्रयत्न अपयशी ठरले. मात्र, मी हिंमत हारणार नाही. मला या सगळ्या प्रसंगांचा सामना करायचा आहे."
दरम्यान, संभावनाला रूमेटाइड अर्थराइटिस हा आजार पूर्वीपासूनच होता. मात्र, योग्य उपचार घेतल्यानंतर हा त्रास कमी झाला होता. परंतु, आता पुन्हा एकदा या आजाराने डोकं वर काढलं आहे. संभावनाने २०१६ मध्ये लेखक, अभिनेता अविनाश द्विवेदीसोबत लग्न केलं आहे.