कोरोना महामारीमुळे संपूर्ण देश लॉकडाऊन आहे. अशात हातावर पोट असलेले हजारो मजुरांना दोन वेळच्या जेवणाची चिंता सतावू लागली आहे. हेच कारण आहे की, हे मजूर स्थलांतर करत आहेत. हजारो किमीची पायपीट करणा-या मजुरांचे जत्थेच्या जत्थे रस्त्यांवर पाहायला मिळत आहेत. मिळेल त्या वाहनाने, प्रसंगी पायी प्रवास करून अनेकांनी आपआपल्या घराचा रस्ता धरला आहे. हे सगळे पाहून भोजपुरी सुपरस्टार रवी किशन प्रचंड चिंतीत आहेत. आता त्यांनी या मजुरांना असे न करण्याचे आवाहन केले आहे. हिंदी आणि भोजपुरी अशा दोन्ही भाषेत त्यांनी मजुरांना पायी प्रवास न करण्याचे आवाहन केले आहे.
एका व्हिडीओत ते म्हणतात, ‘ही वेळ किती कठीण आहे, हे मी जाणतो. तुमच्या चिंता मला माहित आहे. पण मी खूप दु:खी आहे. हजारो मजूर हजारो किमीची पायपीट करून प्रवास करत आहे हे पाहणे वेदनादायी आहे. या संकटाच्या काळात प्रत्येकाला आपल्या कुटुंबाची चिंता सतावते आहे. आपल्या कुटुंबासोबत राहायचे आहे. पण कृपा करून पायी निघू नका.
सायकल, ट्रक, टेम्पो, टँकरमध्ये स्वत:ला लादून प्रवास करू नका. मी तुम्हाला हात जोडून विनंती करतो. आपले पंतप्रधान तुम्हा सर्वांच्या घरी जाण्याची व्यवस्था करत आहेत. रेल्वे मंत्र्यांनी विशेष रेल्वेगाड्या सुरु केल्या आहेत. उत्तर प्रदेश सरकार, बिहार सरकार आपआपल्या परीने तुम्हाला आणण्याचे प्रयत्न करत आहे. तुम्ही मला हिरो बनवले. आज हाच हिरो तुमच्यापुढे हात जोडतो आहे. कृपया घरांसाठी पायी निघू नका.’