'भूल भूलैय्या ३' आणि 'सिंघम अगेन'ची बॉक्स ऑफिसवर चांगलीच चर्चा आहे. हे दोन्ही सिनेमे दिवाळीच्या मुहुर्तावर एकाच दिवशी रिलीज झाले. या वर्षातील बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित सिनेमे म्हणून 'भूल भूलैय्या ३' आणि 'सिंघम अगेन' या दोन सिनेमांकडे बघितलं जात होतं. 'भूल भूलैय्या ३' आणि 'सिंघम अगेन' या दोन सिनेमांना दिवाळीला लागून येणाऱ्या सुट्ट्यांचा चांगलाच फायदा झालेला दिसतोय. बघूया बॉक्स ऑफिसवर कोणत्या सिनेमाने बाजी मारली?
'सिंघम अगेन'चं बॉक्स ऑफिस कलेक्शन किती?
'सिंघम अगेन' सिनेमा १ नोव्हेंबरला दिवाळीच्या मुहुर्तावर रिलीज झाला. या सिनेमाने ओपनिंगलाच रेकॉर्डब्रेक कामगिरी केली. पहिल्या दोन दिवसात 'सिंघम अगेन'ने ८६ कोटींची कमाई केली. याशिवाय रविवारी सिनेमाने तब्बल ३५ कोटींची कमाई केली. एकूणच दिवाळीला लागून येणाऱ्या सुट्ट्यांचा 'सिंघम अगेन'ला चांगलाच फायदा झालाय. सिनेमाने १०० कोटींच्या क्लबमध्ये एन्ट्री केली असून तीन दिवसात १२१ कोटींची कमाई केली.
'भूल भूलैय्या ३'चं बॉक्स ऑफिस कलेक्शन किती?
सेकनिल्कच्या अहवालानुसार कार्तिक आर्यनच्या 'भूल भूलैय्या ३' सिनेमालाही लोकांची चांगलीच पसंती मिळाली आहे. पहिल्या दोन दिवसात 'भूल भूलैय्या ३'ने ७२.५० कोटींची कमाई केलीय. याशिवाय 'भूल भूलैय्या ३'ने तिसऱ्या दिवशी ३३.५ कोटींची कमाई केलीय. अशाप्रकारे पहिल्या तीन दिवसांमध्ये 'भूल भूलैय्या ३'ने १०६ कोटींची कमाई केली. बॉक्स ऑफिसचे आकडे बघता 'भूल भूलैय्या ३' आणि 'सिंघम अगेन' या दोन सिनेमांपैकी 'सिंघम अगेन'ला प्रेक्षकांची चांगली पसंती मिळालेली दिसतेय.