Join us

Bhool Bhulaiya 3 च्या शूटिंगला सुरुवात, दिग्दर्शकाने व्हीलचेअरवर बसूनच सुरु केलं काम

By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2024 1:55 PM

दिग्दर्शक अनीस बझ्मींना झालं तरी काय?

'भूल भूलैय्या' (Bhool Bhulaiya) फ्रँचायझीच्या तिसऱ्या भागाच्या शूटिंगला सुरुवात झाली आहे. या हॉरर कॉमेडी सिनेमाचा मोठा चाहतावर्ग आहे. पहिल्या भागात अक्षय कुमार, विद्या बालन यांची भूमिका होती. विद्या बालनच्या मंजूलिका अवताराने अक्षरश: घाबरवून सोडलं. आता तिसऱ्या भागात मंजुलिका बनून विद्या बालन पुन्हा येत आहे. दरम्यान शूटिंगच्या पहिल्या दिवशी दिग्दर्शक अनीस बज्मी (Anees Bazmi) चक्क व्हीलचेअरवर दिसले. अशा अवस्थेत असूनही त्यांनी शूटिंग ठरलेल्या दिवशीच सुरु करण्याला प्राधान्य दिलं.

'भूल भूलैय्या'  च्या दुसऱ्या भागात कार्तिक आर्यन (Kartik Aryan), किआरा अडवाणी आणि तब्बू यांनी धमाल आणली होती. आता तिसऱ्या पार्टमध्ये कार्तिक सोबत 'अॅनिमल' फेम 'भाभी 2' म्हणजेच अभिनेत्री तृप्ती डिमरी (Tripti Dimri) झळकणार आहे. रुह बाबाच्या रुपात कार्तिक आर्यन आणि त्याच्यासोबत तृप्तीची जोडी कशी दिसते हे पाहण्यासाठी चाहते आतुर आहेत. सिनेमाचे दिग्दर्शक अनिस बज्मी यांनी सोशल मीडियावर पहिल्या दिवशीचे फोटो शेअर केले आहेत. यामध्ये ते व्हीलचेअरवर बसूनच दिग्दर्शन करत आहेत. त्यांच्या पायाला दुखापत झाल्याचं फोटोत दिसतंय. 'माय हॅपी प्लेस' असं त्यांनी कॅप्शन दिलं आहे.

पिंकव्हिलाच्या रिपोर्टनुसार, अनिस बज्मी यांना शूटिंगच्या आदल्या दिवशीच पायाला दुखापत झाल्याने हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. डॉक्टरांनी त्यांना स्टील प्लेट घालावी लागेल आणि तीन महिने आराम करावा लागेल असा सल्ला दिला होता. तसंच सर्जरीचाही पर्याय होता. अनीस बज्मी यांनी सर्जरीचा पर्याय निवडला कारण त्यांना भूल भूलैय्याचं शूट ९ मार्च पासून सुरु होणार होतं. त्यांनी शब्द पाळला आणि सर्जरीनंतर व्हीलचेअरवर बसून त्यांनी दिग्दर्शनाला सुरुवात केली. कामाप्रती निष्ठा आणि शूटिंगला उशीर केल्यास निर्मात्यांचं आर्थिक नुकसान होऊ नये म्हणून त्यांनी हा निर्णय घेतला. 

भूल भूलैय्या 3 याचवर्षी दिवाळीच्या मुहुर्तावर रिलीज होणार आहे. कार्तिक आर्यनच्या या सिनेमाची चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे. कालच कार्तिकने देवाचे आशीर्वाद घेतानाचा फोटो शेअर केला. करिअरमधल्या सर्वात मोठ्या चित्रपटाचं शूटिंग करायला जात आहे असं कॅप्शनही त्याने लिहिलं होतं.

टॅग्स :कार्तिक आर्यनभूल भुलैय्यासिनेमाबॉलिवूड