Singham Again vs Bhool Bhulaiyaa : दिवाळीच्या मुहुर्तावर बॉलिवूडचे दोन बिग बजेट सिनेमे बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित झाले. अजय देवगण आणि कार्तिक आर्यनच्यासिनेमांनी ऐन दिवाळीत बॉक्स ऑफिसवर धमाका केला. पहिल्या दिवसापासूनच या दोन्ही सिनेमांना थिएटरमध्ये हाऊसफूल बोर्ड लागले आहेत. १ नोव्हेंबरला प्रदर्शित झालेल्या अजय देवगणच्या सिंघम अगेन आणि कार्तिक आर्यनच्या 'भूल भुलैय्या ३' सिनेमाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर आलं आहे.
प्रदर्शनाच्या दिवशी दोन्ही सिनेमांनी चांगली कमाई केली होती. अजय देवगणच्या सिंघम अगेनने ४३. ५ कोटींचा बिजनेस केला. तर 'भूल भुलैय्या ३' चित्रपटाने ३५ कोटींचा गल्ला जमवला. शनिवारी आणि रविवारी देखील दोन्ही सिनेमांच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनमध्ये चांगली वाढ दिसून आली होती. मात्र सोमवारीपासून 'भूल भुलैय्या ३' आणि सिंघम अगेन दोन्ही सिनेमांच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनमध्ये घट झाल्याचं दिसत आहे.
सोमवार आणि मंगळवार दोन्ही दिवस 'भूल भुलैय्या ३' आणि सिंघम अगेन चित्रपटांची कमाई घसरली आहे. सोमवारी सिंघम अगेन सिनेमाने १८ कोटी तर मंगळवारी १३.५ कोटींचा गल्ला जमवला. तर कार्तिक आर्यनच्या भूल भुलैय्या ३ने अनुक्रमे १८ आणि १३ कोटींचा बिजनेस केला. बॉक्स ऑफिसवरील कमाईची गाडी घसरली असली तरी अजय देवगणच्या सिंघम अगेनने पाच दिवसांतच १५० कोटींचा टप्पा पार केला आहे. तर 'भूल भुलैय्या ३'ने १३७ कोटींची कमाई केली आहे.
'सिंघम अगेन' आणि 'भूल भूलैय्या ३' हे दोन सीक्वेल असलेल्या सिनेमांची गेल्या कित्येक दिवसांपासून चर्चा होती. तगडी स्टारकास्ट आणि बिग बजेट असलेल्या या सिनेमांच्या प्रतिक्षेत प्रेक्षक होते. 'सिंघम अगेन'मधून अॅक्शनच्या डबल डोसबरोबरच अख्खं बॉलिवूडच मोठ्या पडद्यावर अवरतलं. तर 'भूल भूलैय्या ३'मधून विद्या बालनच्या पुनरागमनासोबत माधुरी दीक्षितचं खास सरप्राइज चाहत्यांना मिळालं. या दोन्ही सिनेमांना प्रेक्षकांची पसंती मिळत असून बॉक्स ऑफिसवर सिनेमांमध्ये काटें की टक्कर पाहायला मिळत आहे.