कार्तिक आर्यन मुख्य भूमिकेत असलेल्या 'भूल भुलैय्या ३' सिनेमाची सध्या सर्वत्र चर्चा आहे. दिवाळीच्या मुहुर्तावर प्रदर्शित झालेल्या या सिनेमाला प्रेक्षकांकडूनही चांगला प्रतिसाद मिळत आहे. 'भूल भुलैय्या २'नंतर या सिनेमाच्या पुढच्या भागासाठी प्रेक्षक उत्सुक होते. अखेर १ नोव्हेंबरला 'भूल भुलैय्या ३' प्रदर्शित करण्यात आला. या सिनेमाच्या प्रमोशन निमित्ताने कार्तिकने कपिल शर्माच्या द ग्रेट इंडियन कपिल शोमध्ये हजेरी लावली होती. या मुलाखतीत त्याने 'भूल भुलैय्या ३' सिनेमाच्या सेटवरचा अनुभव सांगितला.
'भूल भुलैय्या ३'च्या सेटवर कार्तिक आर्यनला विचित्र अनुभव आला होता. या सिनेमाचं शूटिंग एका जुन्या हवेलीत झालं आहे. सिनेमाच्या शूटिंगदरम्यान कार्तिकला या हवेलीत कोणीतरी असल्याचा भास झाला होता. हा अनुभव शेअर करताना कार्तिक म्हणाला, "आम्ही जिथे शूट करत होतो ती एक मोठी हवेली होती. सगळीकडे अंधार होता त्यामुळे भीतीदायक वातावरण होतं. माझा सीन होता. त्याआधी मी कोणाशी तरी बोलत होतो. तेव्हाच कोणीतरी माझ्या पाठीवर ओरखडल्याचं मला जाणवलं. तृप्तीला वाटलं की मी सीनच्या अगोदर अॅक्टिंग करतोय किंवा इम्प्रोवाइज करत असेन. तेव्हा मी तिला सांगितलं की कोणीतरी मला पाठीवर स्क्रॅच केल्याचं जाणवलं. पण, आमच्या पाठीमागे मात्र कोणीच नव्हतं".
दरम्यान, 'भूल भुलैय्या ३' सिनेमा बॉक्स ऑफिसवरही चांगली कमाई करत आहे. शुक्रवारी प्रदर्शित झालेल्या या सिनेमाने तीनच दिवसांत १०० कोटींचा गल्ला पार केला आहे. या सिनेमाने पहिल्या दिवशी ३५.५ कोटींचा गल्ला जमवला होता. तर दुसऱ्या दिवशी ३७ कोटींची कमाई केली होती. रविवारी या सिनेमाने ३३.५ कोटी कमावले. आत्तापर्यंत 'भूल भुलैय्या ३' चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर १०६ कोटींची कमाई केली आहे.
२००७ साली 'भूल भुलैय्या' सिनेमा प्रदर्शित झाला होता. या सिनेमात विद्या बालनने साकारलेली माँज्युलिका प्रेक्षकांना भावली होती. त्यानंतर २०२२ मध्ये या सिनेमाचा सीक्वल प्रदर्शित करण्यात आला होता. पण, त्यात विद्या बालन नव्हती. आता 'भूल भुलैय्या ३'मधून विद्या पुन्हा माँज्युलिका बनून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. या सिनेमात तृप्ती डिमरी, माधुरी दीक्षित यांच्याही मुख्य भूमिका आहेत.