बॉलिवुड अभिनेत्री भूमी पेडणेकर पर्यावरणाच्या संदर्भात एक सजग नागरिक आहे आणि भारतीयांमध्ये हवामान बदल आणि संवर्धनाबद्दल जागरुकता निर्माण करण्यासाठी ती सक्रीय प्रयत्न करत असते. क्लायमेट वॉरिअर या प्रसिद्ध ऑनलाइन आणि ऑफलाइन उपक्रमाची सुरुवात भूमीने केली. पर्यावरणाचे संरक्षण करण्यासाठी भारतीय नागरिकांचा सहभाग वाढावा या दृष्टीने ती या उपक्रमाच्या माध्यमातून प्रयत्न करत आहे. या उपक्रमाला एक वर्ष पूर्ण झाले आहेत आणि हवामान संरक्षणासंदर्भात या उपक्रमाने बराच आवाज उठवला आहे.
भूमीने सांगितले की ती लहानपणापासूनच पर्यावरणाबद्दल सजग आहे. "मला लहानपणापासूनच ही भीती वाटायची की या जगाचं काय होणार? सगळं पाणी संपलं तर जग कसं चालेल, हा प्रश्न पहिल्यांदा मला पडला. त्यानंतर मी हवामान बदलाबद्दल वाचण्यास सुरुवात केली. मी नेहमीच याबाबतीत सजग राहिले, एक शाश्वत जीवनपद्धती जगण्याचा प्रयत्न केला. विशेषत: मी मोठी झाल्यानंतर हे नीट करू लागले. पण, इतकं पुरेसं नाही असं मला वाटतं होतं आणि त्यातूनच क्लायमेट वॉरिअरची सुरुवात झाली."
भूमीने आपल्या अप्रतिम अभिनय कौशल्याने स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे आणि बॉक्स ऑफिसवरही यश मिळवलं आहे. या स्टारडमचा, लोकप्रियतेचा वापर लोकांना हवामान बदलांबद्दल सजग करण्यासाठी ती करते. भूमी म्हणते, "मी अभिनेत्री आहे. मी अनेक लोकांपर्यंत पोहोचू शकते आणि माझ्या सिनेमांच्या माध्यमातून हे करण्याचा मी नेहमीच प्रयत्न करते. मला वाटतं मी यावर बोलायला हवं, माझ्या सोशल मीडिया व्यासपीठांचा वापर करून जगात सकारात्मक बदल आणायला हवा आणि लोकांना हवामान बदलांबद्दल जागरुक करायला हवं."
पर्यावरण संवर्धनासंदर्भात जनजागृती करण्यासाठी प्रत्येक व्यक्तीने सहभागी व्हायला हवे, असे भूमीचे मत आहे. ती सांगते की,"आपण कुटुंबावरील प्रेमाबद्दल बोलतो, आपल्या देशप्रेमाबद्दल बोलतो. आपल्या कुटुंबाला, देशाला, येणाऱ्या पिढ्यांना अधिक सुरक्षित ठेवण्यासाठी हे आपण मनापासून बोलत असतो का? असे सगळे प्रश्न माझ्या मनात पिंगा घालत होतो आणि त्यातूनच मला क्लायमेट वॉरिअर सुरू करण्याची कल्पना सुचली. हे असे एक व्यासपीठ आहे जिथे मी या मुद्द्याचा प्रसार करते आणि शक्य तितकी जागरुकता निर्माण करण्याचा प्रयत्न करते. लोकांना हे कळायला हवं की हवामान बदल हा गंभीर मुद्दा आहे. वैयक्तिक पातळीवर बदल घडवणं हा माझा उद्देश आहे."