‘दम लगाके हई शा’ या चित्रपटातून प्रसिद्ध झालेली अभिनेत्री भूमी पेडणेकर तिच्या वेगवेगळ्या भूमिकांसाठी सतत चर्चेत असते. सध्या ती ''भक्षक'' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटात भूमी ही शेल्टर होममध्ये मुलींवर होणाऱ्या लैंगिक छळाच्या घटनांचा पर्दाफाश करतानाद दिसणार आहे. सध्या ती या चित्रपटाचे जोमाने प्रमोशन करत आहे. वयाच्या १४व्या वर्षी तिच्यावर विनयभंग झाल्याचा खुलासा भूमी ने नुकत्याच एका मुलाखतीमध्ये केला आहे.
Hauterrfly या युट्यूब चॅनेलला भूमी पेडणेकरनं नुकतीच मुलाखत दिली. यावेळी तिने विनयभंगाचा धक्कादायक प्रसंग सांगितला. भूमी म्हणाली, 'मला आजही ती घटना अगदी स्पष्टपणे आठवते. त्याकाळी मुंबईतील वांद्रे येथे जत्रा भरत असे. तेव्हा मी १४ वर्षांची होते आणि माझ्या कुटुंबासोबत फिरत होते. यावेळी मी चालत होते आणि अचानक कोणीतरी मला मागून चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला. मी मागे वळून पाहिलं तरी हे कोणी केलं हे समजू शकले नाही, कारण तिथे खूप गर्दी होती'.
पुढे ती म्हणाली, 'मी कुटुंबासोबत असले तरी तिथे खूप लोक होते. माझ्या बिल्डिंगमधील मुलंही होती, पण त्यावेळी मी काहीच बोलले नाही, कारण जे घडलं त्यामुळे मला धक्का बसला. कारण आपल्याबरोबर जे काही घडतय ते पटवून घ्यायलाच वेळ लागतो. त्यावेळी मला कसे वाटले होते, ते मी विसरू शकत नाही. त्या गोष्टीचा माझ्या मनावर खोलवर परिणाम झाला'.
अभिनेत्रीच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे तर, ती अखेरची कॉमेडी-ड्रामा "थँक यू फॉर कमिंग'मध्ये दिसली होती. आता ती ''भक्षक'' या थ्रिलर चित्रपटात दिसणार आहे. 'भक्षक' सिनेमात भूमी पेडणेकर निडर पत्रकाराची भूमिका साकारत आहे. या सिनेमात दाखवलेल्या घटना ही केवळ बिहारच्या मुझफ्फरपूर शेल्टर होम बलात्कार प्रकरणाची घटना नाही, तर देशात अशा घटना घडतच असतात, असं चित्रपटाचे दिग्दर्शक पुलकित यांचे मत आहे. हा चित्रपट 9 फेब्रुवारी 2024 रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे.