Join us

मनसेच्या खळखट्याकनंतर भूषण कुमारचा माफीनामा, वाचा हे प्रकरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2020 13:29 IST

मनसेने म्युझिक कंपनी टीसीरिजचा मालक भूषण कुमारला इशारा दिल्यानंतर चोवीस तासाच्या आत त्याने माफी मागितली आहे. 

म्युझिक कंपनी टीसीरिजचा मालक भूषण कुमार कालपासून चर्चेत आला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने भूषण कुमारला पाकिस्तानी गायक आतिफ अस्लमचे गाणे हटविण्यास सांगितले होते. हटविले नाही तर महागात पडेल, असा इशाराही दिला होता. त्यानंतर आता भूषण कुमारने मनसेची जाहीर माफी मागितली असून त्याने त्याच्या युट्यूब वाहिनीवरून आतिफ अस्लमची गाणीदेखील हटविली आहेत.

सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येनंतर सिनेइंडस्ट्रीतील बरेच धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. त्यात प्रसिद्ध गायक सोनू निगमने देखील संगीत क्षेत्रातील धक्कादायक वास्तव सांगितले. त्यात त्याने भूषण कुमारचेदेखील नाव घेतले होते. त्यानंतर कॉमेडीयन सुनील पालनेदेखील भूषण कुमारवर आरोप केले होते. मात्र भूषण कुमारने यांची कुणाची माफी मागितली नाही. मात्र मनसेने मंगळवारी भूषण कुमारला माफियागिरी खपवून घेतली जाणार नाही आणि आतिफ अस्लमची गाणी तुझ्या चॅनेलवरून हटविण्यास सांगितले होते.  भूषण कुमार तू याला धमकी समज पण जर तू या गोष्टी बंद केल्या नाहीस तप तुला खूप महागात पडेल असे सांगितले होते. त्यानंतर चोवीस तासाच्या आत आता भूषण कुमारने मनसचे माफी मागितली आहे आणि त्याच्या युट्यूब चॅनेलवरून पाकिस्तानी सिंगर्सची गाणीदेखील हटविली आहेत. पाकिस्तानी कलाकारांना घेऊन काम करणार नाही अशी ग्वाहीदेखील भूषण कुमारने दिली.

मनसे चित्रपट सेनेचे प्रमुख अमेय खोपकर यांनी सोशल मीडियावर लाइव्हच्या माध्यमातून भूषण कुमारला इशारा दिला होता.

ते म्हणाले होते की, माफियागिरी खपवून घेतली जाणार नाही. तुझ्यावर सुरू असलेले आरोप खरे असले तर मागे पुढे पाहणार नाही. आतिफ अस्लम हा पाकिस्तानी गायक आहे. त्यामुळे त्याचे नवीन गाणे तात्काळ टी सीरिजच्या युट्यूब चॅनेलवरून काढा. भूषण कुमार तू याला धमकी समज पण जर तू या गोष्टी बंद केल्या नाहीस तप तुला खूप महागात पडेल.

टॅग्स :राज ठाकरेमनसेभुषण कुमार