मुंबई - बॉलिवूडचे महानायक आणि बिग बि अमिताभ बच्चन हे सोशल मीडियात सातत्याने एक्टीव्ह असतात. आपल्या ट्विटर अकाऊंटच्या माध्यमातून ते नेहमीच विविध विचार पोस्ट करतात. अनेकदा त्यांच्या ट्विटची चर्चा होते. कधी कौतुक तर कधी टीकेलाही त्यांना सामोरे जावे लागते. आता पुन्हा एकदा शायरी ट्विट केल्यामुळे अमिताभ बच्चन यांना ट्रोल करण्यात येत आहे.
अमिताभ यांनी त्यांच्या ट्विटरवरुन एक पोस्ट शेअर केली आहे. त्यामध्ये, मिर्झा गालिब यांचा एक शेर असून त्यास शायर इकबाल यांनी दिलेलं उत्तर असल्याचं अमिताभ यांनी म्हटलंय. मात्र, हे दोन्ही शेअर या प्रसिद्ध शायर यांचे नसल्याचं नेटीझन्स सांगत आहेत. अमिताभ यांच्या पोस्टवरुन अनेकांनी त्यांना ट्रोल केलंय. तर, कुणी त्यांचे वडील हरिवंशराय बच्चन यांच्या वारसाची आठवणही करुन दिलीय. अमिताभ यांनी व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीतून आलेली पोस्ट शेअर केल्याची टीका करत त्यांना व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीचे विद्यार्थी असेही म्हटले आहे.
लेखक आणि आधुनिक राज्यशास्त्राचे इतिहासतज्ज्ञ एस. ईरफान हबीब यांनीही बच्चन यांचे ट्विट रिट्विट करत, आपण ही पोस्ट डिलीट तरी करू शकता, असे सूचवले आहे.
उडने दे इन परिंदों को आझाद फिंजाँ मे गालिबजो तेरे अपने होंग लौट आयेंगेही शायरी मिर्झा गालिब यांची असल्याचं या पोस्टमध्ये सांगण्यात आलंय. तर, उत्तरादाखल शायर इकबाल यांनी केलेली शायरीही पोस्टमध्ये असल्याचं म्हटलंय. ना रख उम्मीद ए वफा किस परिंदे से..जब पर निकल आते है, तो अपने भी आशियना भूल जाते है...अशी दुसरी शायरी आहे.