मुंबई : मेगास्टार बिग बी अमिताभ बच्चन हे हैदराबाद येथे चित्रीकरणादरम्यान झालेल्या दुर्घटनेत जखमी झाले आहेत. आगामी चित्रपट ‘प्रोजेक्ट के’ च्या साहसी दृश्यांचे हैदराबादच्या सेटवर चित्रीकरण करत असताना अपघात होऊन बरगड्या तुटल्या, त्यामुळे आता मुंबईत घरी उपचार घेत आहे, अशी माहिती खुद्द अमिताभ बच्चन यांनी आपल्या ब्लॉगवर दिली आहे.
रविवारी त्यांच्या वैयक्तिक ब्लॉगवर एका पोस्टमध्ये, ८० वर्षीय बच्चन यांनी सांगितले की, त्यांच्या बरगडीचे हाड फ्रॅक्चर झाले तसेच उजव्या बरगडीतील स्नायू फाटले आहेत. पट्टा बांधण्यात आला आहे. हैदराबादस्थित एआयजी रुग्णालयात त्यांचे सीटी स्कॅन करून डॉक्टरांनी त्यांना विश्रांती घेण्याचा सल्ला दिला. त्यामुळे चित्रीकरण रद्द करावे लागले. ‘वेदना होत आहेत, त्यासाठी औषधी दिली आहेत.
श्वास घ्यायला त्रास होत आहे, फारसे फिरता येत नाही,’ अशी माहिती त्यांनी दिली. अमिताभ बच्चन दर रविवारी जुहूच्या जलसा बंगल्याबाहेर उभ्या असलेल्या चाहत्यांना द्वारापर्यंत येऊन भेटत असत; परंतु जखमी झाल्यामुळे त्यांना ते अशक्य झाले आहे. ‘जलसा गेटवर मला तुमची उपस्थिती जाणवते... पण भेटता येणार नाही..’ अशी खंत त्यांनी व्यक्त केली.
नाग अश्विनच्या ‘प्रोजेक्ट के’मध्ये प्रभास आणि दीपिका पदुकोण प्रमुख भूमिकेत आहेत. हा चित्रपट १२ जानेवारी २०२४ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. बच्चन यांचा मागील चित्रपट ‘ब्रह्मास्त्र : भाग एक - शिवा’ हा २०२२चा ब्लॉकबस्टर होता.
‘कुली’च्या सेटवर झाला होता भीषण अपघात...१९८२ : मनमोहन देसाई यांच्या ‘कुली’ या चित्रपटाच्या सेटवर सहअभिनेता पुनीत इस्सार यांच्यासोबत साहसी दृश्याचे चित्रीकरण करताना बच्चन यांच्या पोटात मोठी जखम झाली होती. अनेक महिने ते मुंबईतील रुग्णालयात गंभीर आजारी होते.२०१८ : ‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’ या चित्रपटासाठी साहसी दृश्य चित्रित करताना बच्चन यांच्या पाठ आणि खांद्याला दुखापत झाली होती.