बिग बी अमिताभ बच्चन यांच्या प्रकृतीबाबत मोठी माहिती समोर आली आहे. शुक्रवारी(१५ मार्च) सकाळी ६ वाजता त्यांच्यावर अँजिओप्लास्टी करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. ८१ वर्षांच्या अमिताभ बच्चन यांच्यावर मुंबईतील कोकिलाबेन हॉस्पिटलमध्ये अँजिओप्लास्टी करण्यात आल्याची माहिती दैनिक भास्करने दिली आहे.
शुक्रवारी सकाळी अमिताभ बच्चन यांना कोकिलाबेन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. त्यानंतर त्यांच्यावर अँजिओप्लास्टी करण्यात आली. अँजिओप्लास्टी झाल्यानंतर अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या X अकाऊंटवरुन एक ट्वीट केलं आहे. यामध्ये त्यांनी "नेहमी आभारी राहीन" असं लिहिलं आहे. अमिताभ बच्चन यांच्या प्रकृतीबाबत चाहते चिंतेत आहेत.
अमिताभ बच्चन गेली कित्येक दशके प्रेक्षकांचं पुरेपूर मनोरंजन करत आहेत. त्यांचा चाहता वर्ग प्रचंड मोठा आहे. अनेकदा शूटिंगदरम्यानही अमिताभ बच्चन यांना दुखापत झाली आहे. 'ठग्स ऑफ हिंदुस्तान' सिनेमाच्या शूटिंगदरम्यान स्टंट करताना ते जखमी झाले होते. २०२२मध्ये 'कौन बनेगा करोडपती १४'च्या शूटिंगवेळी त्यांच्या पायाला दुखापत झाली होती. अमिताभ यांना दोन वेळा करोनाची लागणही झाली होती. त्यामुळे त्यांचे चाहते चिंतेत होते.