Join us  

मोठी बातमी! सलमान खानला मुंबई हायकोर्टाचा दिलासा, पत्रकाराशी गैरवर्तन प्रकरणातील FIR रद्द

By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2023 2:16 PM

सलमान खान (Salman Khan)ला मुंबई उच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. अंधेरी मेट्रोपॉलिटन कोर्टाने सलमान खानविरुद्ध बजावलेले समन्स फेटाळत हायकोर्टाने संपूर्ण प्रकरणच फेटाळले आहे.

बॉलिवूडचा दबंग खान सलमान(Salman Khan)ला मुंबई उच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. अंधेरी मेट्रोपॉलिटन कोर्टाने सलमान खानविरुद्ध बजावलेले समन्स फेटाळत हायकोर्टाने संपूर्ण प्रकरणच फेटाळले आहे. सलमान खानवर २०१९ साली पत्रकाराशी गैरवर्तन आणि धमकी दिल्याचा आरोप करण्यात होता. न्यायमूर्ती भारती डांगरे यांच्या एकल खंडपीठाने हा निर्णय दिला. सलमान खानवर पत्रकार अशोक पांडे यांना धमकवल्याचा आरोप होता. आता मुंबई उच्च न्यायालयाने सलमानविरोधातील या प्रकरणातील एफआयआर रद्द करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे सलमान खानला अंधेरी कोर्टात हजर राहावे लागणार नाही, उच्च न्यायालयाने त्याच्याविरोधात दाखल असणारी तक्रार चुकीची असल्याचे म्हणत हे प्रकरण रद्द केले आहे.

पत्रकार अशोक पांडे अंधेरीमध्ये सलमान खानचा व्हिडिओ शूट करत होते, तेव्हा त्यांच्यासोबत गैरवर्तन केल्याचा आरोप सलमान खान आणि त्याच्या बॉडिगार्ड नवाझ शेखवर ठेवण्यात आला होता. मात्र आता मुंबई उच्च न्यायालयाने हे आरोप फेटाळून लावले आहेत. पत्रकाराने अभिनेत्याविरोधात दाखल केलेल्या तक्रारीत म्हटले होते की, सलमान खानने केवळ गैरवर्तन केले नाही तर त्याचा मोबाइलही हिसकावून घेतला होता. या प्रकरणी अशोक पांडे यांनी यापूर्वी अंधेरी येथील दंडाधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती. आयपीसी कलम ५०४ आणि ५०६ अंतर्गत एफआयआर दाखल करण्यात आलेला. त्यावर अंधेरी मेट्रोपॉलिटन कोर्टाने अभिनेत्याला समन्स पाठवले होते. यावर सलमान खानने उच्च न्यायालयात धाव घेतली. मागील वर्षी मुंबई उच्च न्यायालयाने अभिनेत्याला दिलासा देत समन्सला स्थगिती दिली होती.

काय होते प्रकरण ?ही घटना २४ एप्रिल, २०१९ रोजी सकाळी घडली. सलमान खान सायकलवरून जात होता आणि त्यावेळी त्याच्यासोबत त्याचे दोन बॉडीगार्डही होते. अशोक पांडे यांच्या म्हणण्यानुसार, ते कारमधून जात होते आणि त्यांनी सलमानला पाहून त्याच्या बॉडीगार्डच्या परवानगीने अभिनेत्याचे व्हिडीओ शूटिंग सुरु केले. पण अभिनेता संतापल्यानंतर त्याच्या बॉडीगार्डने गाडीकडे धाव घेतली आणि त्याला मारहाण करण्यास सुरुवात केली. अभिनेत्याने मारहाण करुन त्यांचा मोबाईल हिसकावल्याचा आरोपही केला होता. पोलिसांनी त्यांची तक्रार घेतली नव्हती. त्यामुळे त्यांना न्यायालयात जावे लागल्याचे त्यांनी सांगितले होते. 

टॅग्स :सलमान खानमुंबई हायकोर्ट