बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणी दररोज नवनवीन खुलासे समोर येत आहे. आता या प्रकरणाचा तपास सीबीआय करत आहे. दरम्यान आता सुशांत 2013 पासून मानसिक आजाराने त्रस्त होता आणि त्याच्या डिप्रेशनबद्दल कुटुंबियांना माहित असल्याचे समजते आहे. मुंबई पोलिसांना सुशांतच्या कुटुंबियांनी ही माहिती दिली होती. त्याचप्रमाणे सर्वोच्च न्यायालयात देखील त्यांनी याबाबत माहिती दिली आहे.
न्यूज 18 लोकमतच्या रिपोर्टनुसार, सुशांतची मोठी बहीण मीतू सिंग यांनी सांगितले, 'सुशांतने सर्वात आधी 2019 साली ऑक्टोबरमध्ये डिप्रेशनमध्ये असल्याचे कुटुंबाला सांगितले होते. त्यावेळी नीतू आणि प्रियांका मुंबईकडे विमानाने रवाना झाल्या होत्या. त्या काही काळ सुशांतबरोबर होत्या. 2019 मध्ये त्याला नैराश्यात असल्याचे जाणवू लागल्यामुळे त्याने डॉ. के चावला यांच्याकडून औषध घ्यायला सुरुवात केली.'
मुंबई पोलिसांसमोर सुशांतच्या बहिणींचा जबाब नोंदवण्यात आला आहे. याची एक कॉपी सर्वोच्च न्यायालयामध्ये देखील देण्यात आली आहे. त्यांनी दिलेल्या जबाबातून असे स्पष्ट होते आहे की, 2013 पासून सुशांतच्या कुटुंबीयांना त्यांच्या मानसिक आजाराबाबत माहित होते. मीतू सिंग यांच्या स्टेटमेंटनुसार लॉकडाउन दरम्यान तो घरी होता. यावेळी तो व्यायाम आणि पुस्तके वाचत होता. 08 जून रोजी सुशांतने त्याची बहिण मीतूला भेटायला बोलावले. संध्याकाळी मीतूने विचारले त्याची चौकशी केली असता त्याने ठीक वाटत नसल्याचे सांगितले, तसेच लॉकडाऊनमध्ये तो कुठेही जाऊ शकला नव्हता. त्यावेळी मीतू सुशांतबरोबरच राहिली होती, त्यांनी त्याचे दक्षिण भारतात जाण्याच्या प्लॅनबाबत देखील चर्चाा केली. मीतूने त्याच्या आवडीचे पदार्थ बनविले होते. मात्र 12 जून रोजी मीतू तिच्या गोरेगाव येथील घरी परतली कारण तिची मुलगी घरी एकटीच होती. तिने त्यानंतर सुशांतला निरोप पाठवला पण त्याने काहीच उत्तर दिले नाही.
सुशांतच्या बहिणीच्या माहितीनुसार 14 जून रोजी 10.30 वाजता सुशांतला फोन केला पण त्याने फोन उचलला नाही. त्यावेळी मीतूने सिद्धार्थ पिठानीला फोन केला होता. त्यावेळी सिद्धार्थ पिठानीने तिला सांगितले की सुशांतला नारळाचे पाणी आणि डाळिंबाचा रस दिला आहे, तो झोपला असावा. मीतूने सिद्धार्थला सुशांतला पाहण्यास सांगितले तेव्हा त्याचा दरवाजा आतून बंद होता. तेव्हा मीतू म्हणाली की तो कधीच दार बंद करत नाही, त्यामुळे तिने दार उघडण्यास सांगितले आणि ती त्याच्या घराकडे येण्यास निघाली. थोड्या वेळाने मीतूला पुन्हा सिद्धार्थ पिठानीचा फोन आला. त्याने सांगितले की त्याने दरवाजा उघडला आणि त्यावेळी सुशांत हिरव्या कुर्त्यामध्ये पंख्यावर लटकलेल्या अवस्थेत सापडला. त्यांनी त्याला बेडवर खाली उतरवले.
सुशांत सिंग राजपूत प्रकरणात हत्येचा पुरावा नाही, तपास सुरू आहे; सीबीआय अधिकाऱ्याची महत्त्वपूर्ण माहिती
दरम्यान सीबीआय अधिकारीने इंडिया टुडेशी बोलताना सांगितले की, सुशांत सिंग राजपूतची हत्या झाल्याचा अद्याप एकही पुरावा आतापर्यंत सापडलेला नाही. अद्याप या प्रकरणाचा तपास सुरू आहे. सुशांत 14 जून रोजी वांद्रे येथील राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केल्याचे समोर आले होते.