आपल्या हटके स्टाइल आणि रॅपसाठी खासकरुन ओळखला जाणारा एमसी स्टॅन (mc stan) सध्या सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आहे. 'बिग बॉस 16’ (bigg boss 16) चा ट्रॉफी जिंकल्यानंतर त्याचं नशीब चांगलंच उजळलं आहे. या शोमधून बाहेर पडल्यानंतर आता त्याला चक्क किंग खान म्हणजेच शाहरुख खानसोबत काम करायची संधी मिळणार आहे. त्यामुळे सध्या स्टॅन पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.
'टाइम्स नाऊ'च्या वृत्तानुसार, स्टॅन लवकरच शाहरुखच्या 'जवान' चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटाबाबत निर्मात्यांनी स्टॅनसोबत चर्चाही केली आहे. त्यामुळे स्टॅन लवकरच किंग खानसोबत स्क्रीन शेअर करणार आहे. सोशल मीडियावर जरी या वृत्ताची चर्चा होत असली तरीदेखील स्टॅनने याविषयी कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही.
कोण आहे एमसी स्टॅन?
एमसी स्टॅन हा २३ वर्षाचा एक हिंदी रॅपर आहे. युट्युबवरचे त्याचे रॅप सॉन्ग प्रचंड लोकप्रिय असून त्याची युनिक पर्सनॅलिटी पाहून त्याला बिग बॉस हा शो ऑफर करण्यात आला. एमसी स्टॅन पुण्याचा आहे. त्याचं खरं नाव अल्ताफ तडवी आहे. पुण्यात जन्मलेल्या एमसी स्टॅनचं कुटुंब एका चाळीत राहायचं. १२ व्या वर्षी स्टॅनने कव्वाली गाण्यास सुरुवात केली. आज एमसी स्टॅन हिप-हॉप इंडस्ट्रीतील मोठा चेहरा आहे.
तरुणांमध्ये स्टॅनची विशेष क्रेझ
लोकप्रियतेच्या बाबतीत स्टॅनने बड्या बड्या बॉलिवूड सेलिब्रिटींना मागे टाकलं आहे. ऑरमॅक्सने पॉप्युलॅरिटी लिस्ट म्हणजे लोकप्रिय व्यक्तींची यादी जारी केली आहे. जानेवारी २०२३ च्या Most Popular Non-Fiction Personalities यादीमध्ये एमसी स्टॅनने सलमान खानलादेखील मागे टाकलं आहे. बिग बॉस जिंकल्यानंतर एमसी स्टॅन इन्स्टावर लाईव्ह केलं होतं त्याच्या या इन्स्टा लाईव्हनेही इतिहास रचला. अवघ्या १० मिनिटांत एमसी स्टॅनचे लाइव्ह व्ह्यू पाच लाखांवर पोहोचले. तो लाइव्ह असताना ५ लाख ४१ हजार लोक त्याला पाहत होते. इतके जास्त व्ह्यूज असणारा एमसी स्टॅन हा पहिला भारतीय सेलिब्रिटी बनला आहे.