मुंबई – संपूर्ण जगभरात कोरोना व्हायरसनं हाहाकार माजवला आहे. लाखो लोकांचा जीव कोरोनानं घेतला आहे. यातच कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी सध्या जगभरातील देश कोरोना लसीकरणावर भर देत आहेत. लसीकरण मोहिम देशात कोरोना नियंत्रण मिळवण्याची फायदेशीर ठरत असल्याचंही दिसून येत आहे. मात्र आजही काहींना लसीकरण अभियानावर संशय आहे.
अभिनेता बिजय जे आनंद(Bijay J Anand) यातील एकच व्यक्तिमत्व आहे ज्यांना कोरोना लसीकरणावर विश्वास नाही. अलीकडेच दिलेल्या मुलाखतीत त्यांनी लसीकरणाला राजकारणाशी जोडलं आहे आणि यात सर्वात मोठा घोटाळा असल्याचं सांगितले आहे. भलेही काम सोडावं लागलं तरी चालेल पण लसीकरण करणार नाही असा दावा त्यांनी केला आहे. हिंदुस्तान टाइम्सच्या मुलाखतीत बिजय आनंद यांनी असाही खुलासा केला आहे की, माझ्या हातून दोन सिनेमा गेले ज्यांचे शुटींग लंडनमध्ये होतं. त्यात एक वेब सिरीज समाविष्ट होती असं त्यांनी सांगितले.
तसेच दुबईत मला पुरस्कार मिळाला होता परंतु मी तिथे जाऊ शकलो नाही. प्रोफेशनली मी हे सगळं पाहिलं आहे. भलेही मला काम मिळालं नाही तरी मी लस घेणार नाही असं बिजय आनंद यांनी म्हटलं तेव्हा यामागचं कारण काय असं मुलाखतीत त्यांना विचारण्यात आलं तेव्हा ते म्हणाले की, माझ्यासाठी शरीर एक मंदिर आहे आणि त्यात मी कुठलंही केमिकल जाऊ देणार नाही. मला अभिनय नको, मी नोकरीही करणार नाही. मी या सर्व गोष्टीला नकार दिलाय असं त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान बिजय आनंद यांच्या पत्नीनेही कोविड लसीकरण केले नाही. त्यांची मुलगी जी सध्या १४ वर्षाची आहे ती लंडनला जाण्यासाठी तयार आहे परंतु आई वडील सोबत येऊ शकत नाहीत त्यामुळे ती निराश आहे. बिजय आनंद हे अभिनयासोबत एक योगा टीचरही आहेत. जगभरात अनेक विद्यार्थी आहेत जे बिजय आनंद यांच्याकडून योगाचे धडे घेतात. बिजय आनंद यांनी प्यार तो होना हे मध्ये काम केले होते. त्याचसोबत अलीकडेच शेरशाहमध्ये ते दिसून आले. ज्यात कियारा आडवाणीच्या वडिलांची भूमिका बिजय आनंद यांनी निभावली होती.