माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या आयुष्यावर आधारित ‘द एक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर’ हा चित्रपट लवकरच आपल्या भेटीस येतो आहे. साहजिकचं, मनमोहन सिंग यांच्या आयुष्यावर चित्रपट आला, तसा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही येणार का? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. तर या प्रश्नाचे उत्तर ‘हो’ असे आहे. होय, अनुपम खेर स्टारर ‘द एक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर’नंतर प्रेक्षक नरेंद्र मोदी यांच्या आयुष्यावरचा चित्रपटही बघू शकणार आहेत. या चित्रपटाचे नाव असेल, ‘पीएम नरेंद्र मोदी’. आता तुम्हाला आणखी एक प्रश्न पडला असेल, तो म्हणजे, कोण बनणार पीएम मोदी? तर याचे उत्तर आहे, विवेक ओबेरॉय. होय, अभिनेता विवेक ओबेरॉय या चित्रपटात पीएम मोदी यांची व्यक्तिरेखा साकारताना दिसणार आहे. याची अधिकृत घोषणाही झालीय.
विवेक ओबेरॉय बऱ्याच दिवसांपासून मोठ्या पडद्यावर दिसलेला नाही. पण तो एक दमदार अभिनेता आहे, यात जराही शंका नाही. त्याला मिळालेल्या प्रत्येक चित्रपटात त्याने जीव ओतला. २०१३ मध्ये आलेल्या ‘क्रिश 3’ या चित्रपटात विवेक निगेटीव्ह रोलमध्ये दिसला होता. त्याच्या या भूमिकेचेही प्रचंड कौतुक झाले होते. आता पीएम मोदीच्या भूमिकेचे शिवधनुष्य तो कसा पेलतो, तेच तेवढे बघायचेय.