बॉलिवूडमध्ये आतापर्यंत अनेक दिग्गज व्यक्तींचा प्रवास बायोपिकच्या माध्यमातून उलगडण्यात आला आहे. अगदी राजकीय व्यक्तीमत्त्वांपासून ते क्रीडाक्षेत्रापर्यंत अनेक जणांवर आधारित चित्रपट निर्मिती करण्यात आली आहे. यात क्रिकेटपटू महेंद्र सिंग धोनी, कपिल देव या क्रीडाविश्वातील दिग्गजांचाही समावेश आहे. विशेष म्हणजे या दोन दिग्गजांचा जीवनप्रवास उलगडल्यानंतर आता भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली यांच्यावर आधारित चित्रपटही लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकतीच या आगामी बायोपिकची घोषणा करण्यात आली आहे.
क्रिकेट विश्वातील दादा अशी पदवी मिळवणाऱ्या सौरव गांगुली यांच्या बायोपिकची निर्मिती लव्ह रंजन आणि अंकुर गर्ग करणार असून नुकतीच त्यांनी इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. "दादा सौरव गांगुली यांच्या बायोपिकची निर्मिती लव्ह फिल्म्स प्रोडक्शनच्या अंतर्गत करण्यात येणार आहे, हे सांगताना फार आनंद होतोय", असं म्हणत लव्ह रंजन यांनी या बायोपिकची घोषणा केली आहे. सोबतच 'गेम ऑन' असं कॅप्शनही दिलं आहे.
लव्ह फिल्म्सकडून बायोपिकची घोषणा झाल्यानंतर सौरव गांगुली यांनीही ट्विटवर पोस्ट शेअर केली आहे. "क्रिकेट हेच माझं आयुष्य आहे. क्रिकेटमुळेच मला मान ताठ करुन चालण्याचा आत्मविश्वास आणि क्षमता मिळाली. लव्ह फिल्म्स माझ्या जीवनप्रवासावर एक बायोपिक तयार करुन तो रुपेरी पडद्यावर दाखवतील याचाच मला आनंद आहे, अशी पोस्ट सौरव गांगुली यांनी लिहिली आहे."
दरम्यान, या बायोपिकमध्ये सौरव गांगुली यांची भूमिका कोणता अभिनेता साकारणार हे मात्र अद्याप गुलदस्त्यात ठेवण्यात आलं आहे. लव्ह रंजन यांनी यापूर्वी ‘दे दे प्यार दे’, ‘छलांग’, मलंग, यांसारख्या चित्रपटांची निर्मिती केली आहे. तसेच ‘प्यार का पंचनामा’, ‘सोनू के टीटू की स्वीटी’ या चित्रपटांचं दिग्दर्शन केलंय.