21 ऑक्टोबर म्हणजे, शम्मी कपूर यांची बर्थ अॅनिव्हर्सरी. शम्मी कपूर यांच्या डान्सचे अनेकजण ‘दिवाने’ होते. 21 ऑक्टोबर 1931 रोजी मुंबईत जन्मलेले शम्मी कपूर म्हणायला कपूर कुटुंबात जन्मले. पण त्यांचे आयुष्य सोपे नव्हते. याचे कारण म्हणजे, शम्मी यांना स्वबळावर आपले आयुष्य घडवायचे होते. 50 रुपए पगाराची पहिली नोकरी त्यांनी स्वीकारली होती ती त्यामुळेच. शम्मी कपूर यांनी दोन लग्ने केलीत. पण दुस-या लग्नावेळी त्यांनी अशी काही अट ठेवली होती की, आजही बॉलिवूडमध्ये त्याची चर्चा होते. गीता बालीसोबतच्या विवाहासंदर्भातील एक किस्साही आजही ऐकवला जातो. लाल लिपस्टिकने भरली भांग
एकत्र काम करता करता शम्मी कपूर व गीता बाली एकमेकांच्या प्रेमात पडले होते. अनेक दिवस गीता शम्मी यांना नकार देत राहिल्या. 1955 साली रानीखेतमध्ये ‘रंगीन रातें’ या सिनेमाचे शूटींग सुरु होते. याच सिनेमाच्या सेटवर शम्मी यांनी गीता यांना प्रपोज केले होते. पण गीता यांची नकारघंटा सुरु होती. तू माझ्यावर प्रेम करतेस का? हा एकच प्रश्न शम्मी रोज करायचे आणि गीता नकार द्यायच्या. एकदिवस मात्र शम्मी यांनी हा प्रश्न केला आणि गीता यांनी लगेच होकार दिला. यावर चल, लग्न करू, असे शम्मी म्हणाले आणि त्यांच्या त्या वाक्याने गीता अवाक् झाल्या. पण लग्न झालेच. होय, त्याक्षणी मध्यरात्री मंदिरात जाऊन दोघांनीही लग्न केले. मजेशीर म्हणजे, शम्मी कपूर घाईघाईत कुंकू विसरले. अशावेळी काय तर गीता यांनी पर्समधून लिपस्टिक काढून दिली आणि शम्मी यांनी त्या लाल लिपस्टिकने गीता यांची भांग भरली. लग्नानंतर शम्मी व गीता आनंदात संसार करू लागलेत. दोन मुलेही झालीत. मात्र 1965 मध्ये वयाच्या अवघ्या 34 व्या वर्षी गीता बाली यांचे निधन झाले होते. पत्नीच्या निधनाने शम्मी कपूर कोलमडून गेले होते. त्यांनी स्वत:कडे लक्ष देणे सोडून दिले होते. त्यामुळे त्यांचे वजन खूप वाढले. वाढलेल्या वजनामुळे हीरो म्हणून त्यांच्या करिअरला उतरती कळा लागली आणि हळूहळू त्यांना चित्रपट मिळणे बंद झाले.
मुले लहान असल्याने घरच्यांनी शम्मी यांच्यावर दुस-या लग्नासाठी दबाव टाकणे सुरु केले. नीला देवीसोबत शम्मी यांनी लग्न करावे, अशी कुटुंबीयांची इच्छा होती. पण शम्मी कपूर मानेनात. घरच्यांचा दबाव इतका होता की, अखेर शम्मी कपूर दुस-या लग्नासाठी तयार झालेत. पण काही अटींवर. होय, शम्मी यांनी नीला देवींसमोर काही अटी ठेवल्या. यापैकी पहिली अट कुठली तर अर्ध्या रात्री मंदिरात लग्न करण्याची.
अर्ध्या रात्री गीता बालीसोबत लग्न केले होते, तसेच लग्न करायचे...होय, 1955 मध्ये बाणगंगा मंदिरात अर्ध्या रात्री गीता बालीसोबत लग्न केले होते, तसेच लग्न करायचे, ही त्यांची पहिली अट होती. दुसरी अट होती, नीला देवींनी कधीही आई न बनणे. नीला देवींनी या दोन्ही अटी मान्य केल्या. नीला देवी कधीच आई बनल्या नाहीत. शम्मी कपूर व गीता बाली यांच्या मुलांना त्यांनी आपलेसे केले.