अमिताभ बच्चन यांचा आज (११ आॅक्टोबर) वाढदिवस. अमिताभ बच्चन यांना बॉलिवूडचे महानायक म्हणतात. कारण कुठलीही भूमिका साकारणे त्यांच्यासाठी अवघड नाही. अगदी बेमालूमपणे ते कुठल्याही भूमिकेत शिरतात आणि ती भूमिका अक्षरश: जिवंत करतात. आज आपण अमिताभ यांच्या काही सर्वात दमदार भूमिकांबद्दल जाणून घेणार आहोत...
‘अग्निपथ’ या चित्रपटात अमिताभ यांनी साकारलेली भूमिका इतकी जबरदस्त होती, की त्याला तोड नाही. या चित्रपटात अमिताभ यांनी विजयची भूमिका साकारली होती. अन्य कुठल्याच अभिनेत्याने या भूमिकेला त्यांच्याइतका न्याय दिला नसता.
‘नि:शब्द’ या चित्रपटातील त्यांची भूमिका खऱ्या अर्थाने आव्हानात्मक होती. एक प्रौढ व्यक्ती आपल्या मुलीच्या वयाच्या तरूणीच्या प्रेमात पडतो, ही भूमिका अमिताभ यांच्या यादगार भूमिकांपैकी एक आहे.
‘बंटी और बबली’ या चित्रपटात अमिताभ यांनी एका पोलिस अधिका-याची भूमिका साकारली. बीडी ओढणारा आणि चोरांची हयगय न करणारा पोलिस अधिकारी़ कजरारे गाण्यात ऐश्वर्या व अभिषेकसोबतचा त्यांचा डान्स तर विचारायलाच नको.
‘चिनी कम’ या चित्रपटात अमिताभ यांनी साठी ओलांडलेल्या एका अविवाहित पुरूषाची भूमिका साकारली होती. ३४ वर्षांच्या एका तरूणीच्या प्रेमात पडल्यावर त्याच्यात अनेक बदल होतात. ही भूमिका आपल्याला अमिताभ यांच्या प्रेमात पडण्यास भाग पाडते.
‘पा’ या चित्रपटातील अमिताभ यांची भूमिका सर्वाधिक अनोखी आणि दमदार ठरली. यात त्यांनी आपल्या रिअल लाईफ मुलाच्या म्हणजे अभिषेकच्या मुलाची भूमिका साकारली आहे. ही भूमिका त्यांनी अशी काही साकारली की, हे अमिताभ आहेत, यावर अनेकांचा विश्वास बसेना.
‘ब्लॅक’ या चित्रपटातील त्यांनी साकारलेला शिस्तप्रिय शिक्षक अजूनही लोकांच्या लक्षात आहे.
‘झूम बराबर झूम’ या गाण्यात म्हणायला अमिताभ यांनी कॅमिओ केला होता. केवळ एक गाण्यात काही मिनिटांची त्यांची भूमिका होती़ पण यातील त्यांचा लूक अतिशय वेगळा होता.
‘पीकू’ या चित्रपटातही आपल्यासारखा दुसरा कुणीचं नाही, हे त्यांनी सिद्ध करून दाखवले.