आशिकी हा चित्रपट नव्वदीच्या काळात चांगलाच गाजला होता. या चित्रपटातील सगळ्याच व्यक्तिरेखा प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतल्या होत्या. या चित्रपटातील सगळीच गाणी हिट झाली होती. या चित्रपटाला अनेक वर्षं झाले असले तरी या चित्रपटाची लोकप्रियता आजदेखील कमी झालेली नाही. या चित्रपटाने राहुल रॉय आणि अनू अग्रवाल यांना एका दिवसांत स्टार बनवले होते. त्या काळातील तरुणांसाठी ते दोघे रोल मॉडेल होते. आज अनूचा वाढदिवस असून आशिकी हा तिचा पहिलाच चित्रपट होता. त्यानंतर तिने किंग अंकल, खलनायिका यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले. पण तिला म्हणावे तसे यश मिळाले नाही.
अनूच्या आयुष्यात घडलेल्या एका घटनेमुळे तिचे आयुष्य पूर्णपणे बदलले. तिचा १९९९ मध्ये एक अपघात झाला होता. या अपघातानंतर अनू २९ दिवस कोमात होती. त्यानंतर तिला अनेक महिने मुंबईतील एका रुग्णायलात दाखल करण्यात आले होते. ती कोमातून बाहेर आली असली तरी या अपघातामुळे तिचे संपूर्ण आयुष्य बदलले होते. तिला या अपघातानंतर तिच्या भूतकाळातील अनेक गोष्टी आठवत नव्हत्या. तिला या सगळ्यातून बाहेर पडायला काही वर्षं लागली. आजारपणातून बाहेर आल्यानंतर तिने तिची सगळी संपत्ती दान केली आणि संन्यास घेतला. तिने २०१५ मध्ये "Anusual- Memoir of a Girl who Came Back from the Dead" हे तिच्या आयुष्यावर पुस्तक लिहिले होते. त्यात तिने तिच्या बॉलिवूड करियरविषयी आणि तिच्या या अपघाताविषयी लिहिले होते. हे पुस्तक प्रचंड गाजले होते.
अनू सध्या लोकांना योगा शिकवते. गेल्या काही वर्षांपासून ती बॉलिवूडपासून दूर असली तरी काही महिन्यांपूर्वी तिने द कपिल शर्मा शोमध्ये हजेरी लावली होती. अनूमध्ये आता इतका बदल झाला आहे की, तिला ओळखणे देखील शक्य नाहीये.