Akshaye Khanna Birthday: आ अब लौट चले, हलचल, दिल चाहता है अशा अनेक चित्रपटांतील दमदार अभिनयासाठी ओळखला जाणारा अभिनेता अक्षय खन्ना (Akshaye Khanna ) याचा आज (28मार्च) वाढदिवस. लोकप्रीय अभिनेते विनोद खन्ना याचा मुलगा अशी ओळख घेऊन अक्षय खन्नाबॉलिवूडमध्ये आला खरा. पण अक्षयचं करिअर म्हणावे तसे बहरलं नाही. पर्सनल लाईफचं म्हणावं तर, आज 47 व्या व्या वषीर्ही अक्षय खन्ना अविवाहित आहे. अक्षय अजूनही अविवाहित आहे. पण त्याचं नाव अनेक अभिनेत्रींशी जुळलं. विश्वास बसणार नाही पण एका अभिनेत्रीसोबत त्याचं लग्न अगदी होता होता राहिलं. बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमारच्या अनेक गर्लफ्रेन्डला अक्षय खन्नानं डेट केलं. पूजा बत्रा, रवीना टंडन, शिल्पा शेट्टी,ट्विंकल खन्ना आदींसोबत अक्षय खन्नाचं नाव जुळलं. ऐश्वर्या रायसोबतही त्याच्या डेटिंगच्या बातम्या आल्या. अर्थात अक्षय यावर मौन बाळगणंच पसंत केलं.
होता होता राहिलं लग्न...खरं तर ‘ताल’ या चित्रपटानंतर अक्षयने लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. बॉलिवूडच्या एका बड्या अभिनेतीवर त्याचा जीव जडला होता. ही अभिनेत्री होती करिश्मा कपूर. होय, अक्षयला करिश्मा मनापासून आवडत होती. करिश्मा वडील रणधीर कपूर यांनाही अक्षय पसंत होता. आपल्या लेकीचं लग्न अक्षय खन्नाशी व्हावं, अशी त्यांची इच्छा होती. अक्षयचे वडील विनोद खन्ना यांनाही हा प्रस्ताव मान्य होता. पण एक व्यक्ति या लग्नाआड आली आणि हे लग्न होता होता राहिलं. ती व्यक्ती कोण तर करिश्माची आई बबीता.
होय, करिश्माची आई बबीता यांनी या लग्नाला जोरदार विरोध केला. त्याकाळात करिश्मा यशाच्या शिखरावर होती. करिश्माने याकाळात लग्न करू नये, अशी बबीतांची इच्छा होती. त्यांच्या इच्छेखातर करिश्माच्या लग्नाचा विषय मागे पडला आणि अक्षय व करिश्माच्या लग्नाची बोलणीही थांबली. पुढे करिश्माने संजय कपूरसोबत लग्नगाठ बांधली पण अक्षय मात्र अद्यापही अविवाहितच आहे.अक्षय कधीच यावर बोलला नाही. लग्नाचा विषय आला की, त्यानं तो टाळला. पुढे पुढे तर मला जबाबदारी नको होती, म्हणून मी लग्न केलं नाही, असं तो सांगू लागला. सिमी गरेवालच्या चॅट शोमध्ये अक्षय लग्नाबद्दल बोलला होता. ‘ मी कमिटमेंटसाठी कधीही तयार नव्हतो. लग्नानंतर सगळंच बदलतं. मुलं झाल्यानंतर तर तुमचं आयुष्य मुलांभोवती केंद्रीत होतं. ही जबाबदारी पेलायची माझी कधीच तयारी नव्हती. म्हणून मी लग्नाचा विचारच केला नाही, असं तो म्हणाला होता.
अक्षय खन्नाचा पहिला चित्रपट होता ‘हिमालय पुत्र’ पण हा चित्रपट पूर्णपणे फ्लॉप झाला. अक्षयचे पिता विनोद खन्ना हेच अक्षयच्या या चित्रपटाचे निमार्ते होते. अक्षयने ना कुठला अॅक्टिंगचा क्लास लावला, ना चित्रपट पाहत सुटला. पण अक्षयने एक गोष्ट मात्र पक्की ठरवली होती. ती म्हणजे, त्याला आयुष्यात अभिनेता व्हायचं होतं. त्यामुळेच वयाच्या 18 व्या वर्षी अक्षयने अभिनयाच्या दुनियेत पाऊल ठेवलं.
‘हिमालय पुत्र’ या एका फ्लॉपनंतर अक्षय ‘बॉर्डर’ मध्ये दिसला. अक्षयचा हा दुसरा चित्रपट मात्र कमालीचा हिट झाला. नाही म्हणायला या चित्रपटात सनी देओल, सुनील शेट्टी, जॅकी श्रॉफ असे अनेक दिग्गज स्टार होते. पण अक्षय खन्नाचं काम सगळ्यांच्याच डोळ्यात भरलं. यानंतर मोहब्बत, कुदरत, लावारिस अशा अनेक चित्रपटात अक्षय झळकला. पण एकापाठोपाठ आलेले हे सगळे चित्रपट फ्लॉप गेलेत.
1999 मध्ये ऐश्वर्या रायसोबतच्या ‘आ अब लौट चले’ या चित्रपटानं अक्षयच्या करिअरला थोडा आधार दिला. हा चित्रपट फार चालला नाही. पण ऐश्वर्या व अक्षयची जोडी हिट ठरली. याच जोडीला घेऊन सुभाष घई ‘ताल’ घेऊन आलेत. या चित्रपटाने अक्षय पुन्हा प्रकाशझोतात आला. 2001 मध्ये आलेल्या ‘दिल चाहता है’ या चित्रपटात अक्षयने आमिर खान, सैफ अली खानसोबत स्क्रीन शेअर केली आणि यातील त्याचा परफॉर्मन्स सगळ्यांच्याच डोळ्यांत भरला. ‘गांधी-माय फादर’ या चित्रपटात अक्षयने महात्मा गांधी यांचा मुलगा हरिलाल गांधी यांचं पात्र साकारलं ही भूमिका अक्षयच्या आत्तापर्यंतच्या कारकिर्दीतील सगळ्यांत वाखाणली गेलेली भूमिका आहे.