ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांचा आज (७ मार्च) वाढदिवस. ७ मार्च १९५५ साली शिमल्यातील एका काश्मिरी पंडित कुटुंबात अनुपम यांचा जन्म झाला. शिक्षण पूर्ण केल्यानंतर अभिनेता बनण्याच्या इच्छेने अनुपम खेर मुंबईत आले. संघर्षाच्या काळात फुटपाथ आणि रेल्वे स्टेशनवर झोपण्याची वेळ त्यांच्यावर आली. पण अनुपम डगमगले नाहीत. आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर अनुपम यांनी बॉलिवूडमध्ये आपला एक वेगळा ठसा उमटला. ३५ वर्षांच्या फिल्मी करिअरमध्ये ५०० हून अधिक चित्रपटांत काम केले. बॉलिवूडच्या या प्रतिभावान अभिनेत्याचे आयुष्य कमी फिल्मी नव्हते. त्यांच्या पहिल्या प्रेमाचा किस्सा तर चांगलाच फिल्मी होता.
खुद्द अनुपम यांनी एका मुलाखतीत हा किस्सा सांगितला होता. त्याकाळात प्रेम आजच्यासारखे ‘फास्ट’ नव्हेत. त्याच काळाबद्दल अनुपम बोलले होते. त्यांनी सांगितले होते की, ‘त्या काळात एका मुलीसोबत साधे बोलायलाही वर्ष जात असे. आम्हा हिंदी मीडियमवाल्यांना इंग्लिश मीडियमच्या मुली अजिबात भाव देत नसत. मला आठवते, आमच्या ग्रूपमध्ये एक मुलगी होती. एकदिवस मी भूताची कथा ऐकवत होतो. सोबत पाच-सहा मित्रही होते. माझी भूताची कथा ऐकून ती मुलगी इतकी घाबरली की, तिने घाबरून माझा हात घट्ट पकडला अन् कथेचा शेवट ऐकून तर ती इतकी घाबरली की, तिने मला गच्च पकडले. त्याच क्षणाला या मुलीच्या मनात जागा मिळवायची तर तिला घाबरणे गरजेचे आहे, असे मला वाटले आणि एकतर्फी प्रेमाचे इमले बांधण्यास मी सुरुवात केली. मी एकतर्फी प्रेमात असताना त्याच दिवसांत शिमल्यातील एका थिएटरमध्ये ‘एग्जॉस्टेड’ हा हॉरर सिनेमा लागला होता. मी आधी मित्रांसोबत तो सिनेमा पाहायला गेलो. चित्रपटातील कोणते सीन्स पाहून ती घाबरले, याचा अंदाज घेणे, हा माझा एकमेव उद्देश होता. मला तसा एक सीन सापडलाही. दुस-या दिवशी त्या मुलीला घेऊन मी तोच सिनेमा बघायला गेलो. चित्रपट सुरु झाला आणि मी त्या सीनची प्रतीक्षा करू लागलो. तो सीन येताच मी माझा हात सीटवर ठेवला. माझा बाण एकदम निशाण्यावर लागला. तो सीन पाहून ती प्रचंड घाबरली. इतकी घाबरली की, तिने माझ्या हाताची बोटे दातांनी इतकी करकचून चावली की, अख्ख्या थिएटरमध्ये माझ्या किंचाळण्याचा आवाज ऐकू आला. त्यादिवशी माझ्या मानगुटीवरचे प्रेमाचे भूत कायमचे उतरले.’