Join us

अनुपम खेर यांनी केली होती 100 रूपयांची चोरी, पोलिसांपर्यंत पोहोचले होते प्रकरण

By ऑनलाइन लोकमत | Published: March 07, 2020 8:00 AM

ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांचा आज वाढदिवस.  

ठळक मुद्देहा किस्सा खुद्द अनुपम यांनी एका मुलाखतीत सांगितला होता.

ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांचा आज (7 मार्च) वाढदिवस.  7 मार्च 1955 साली शिमल्यातील एका काश्मिरी पंडित कुटुंबात अनुपम यांचा जन्म झाला. शिक्षण पूर्ण केल्यानंतर अभिनेता बनण्याच्या इच्छेने अनुपम खेर मुंबईत आले. संघर्षाच्या काळात फुटपाथ आणि रेल्वे स्टेशनवर झोपण्याची वेळ त्यांच्यावर आली. पण अनुपम डगमगले नाहीत. आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर अनुपम यांनी बॉलिवूडमध्ये आपला एक वेगळा ठसा उमटला. 35 वर्षांच्या फिल्मी करिअरमध्ये 500 हून अधिक चित्रपटांत काम केले. बॉलिवूडच्या या प्रतिभावान अभिनेत्याचे आयुष्य कमी फिल्मी नव्हते. आज त्यांच्या आयुष्यातला एक इंटरेस्टिंग किस्सा आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

तर ही गोष्ट आहे 70 च्या दशकताील. शिमल्यातील एका मध्यवर्गीय कुटुंबात त्यादिवशी 100 रूपयांची चोरी झाली. विशेष म्हणजे घरातील देवघरातून हे पैसे चोरीस गेले. छोटेसे घर होते आणि या घरात जवळजवळ डझनभर लोक एकत्र राहत होते. याच संयुक्त कुटुंबात 100 रूपये चोरी गेलेत आणि गोष्ट पोलिसांपर्यंत पोहोचली. या घरात दोन मुलं होती. यापैकी एक पिकनिकच्या नावावर घरातून बाहेर गेला होता. सर्वांचा संशय त्याच्यावरच होता. पण मी चोरी केलीच नाही, असे तो ठासून सांगत होता. पोलिस आलेत आणि गेलेत. काही दिवसानंतर चोरीचा मामला जरा शांत झाला.

एक दिवस घरात बैठक जमली. पुन्हा चोरीवर चर्च झाली. यावेळी थेट त्या लहानग्याला बैठकीत उभे केले गेले. तो कोण तर अनुपम खेर.चोरी केली असेल तर आत्ताच सांग, असे वडिलांनी विचारले. वडिलांच्या डोळ्यात राग होता. अनुपम खेर घाबरले. आता खर बोलण्यातच भलाई आहे, हे त्यांनी ओळखले. अखेर त्यांनी चोरीची कबुली दिली. देवघरातील 108 रूपयांपैकी 100 रूपये मी चोरले होते, असे त्यांनी सांगितले. पण का? असा पुढचा सवाल तयार होता. यावर त्यांचे उत्तर ऐकून सगळ्यांनाच धक्का बसला.

अ‍ॅक्टिंगच्या अभ्यासक्रमासाठी मुलाखत द्यायला चंदीगडला गेलो होतो, असे त्यांनी सांगितले. पुढच्याच क्षणात अनुपम खेर यांच्या गालावर एक जोरदार चपराक बसली. आईने त्यांच्या मुस्काटात लावली होती. आईचा राग पाहून अखेर अनुपम यांच्या वडिलांनी मध्यस्थी केली. वडिलांच्या हातात एक पत्र होते. होय, त्यांच्या मुलाचे अ‍ॅक्टिंगच्या अभ्यासक्रमासाठी सिलेक्शन झाले होते. शिकता शिकता दरमहा 200 रूपये स्टायपेंडही मिळणार होता. ते पत्र दाखवत वडिलांनी अनुपम यांना जवळ घेतले आणि काळजी करू नकोस, चोरीचे पैसे तुझा मुलगा परत करेल, असे ते पत्नीला म्हणाले. हा किस्सा खुद्द अनुपम यांनी एका मुलाखतीत सांगितला होता. 

टॅग्स :अनुपम खेर