बोमन इराणी यांनी अभिनेता म्हणून बॉलिवूडमध्ये आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. ‘थ्री इडियट्स’ या चित्रपटातील वायरसची भूमिका असो किंवा ‘मुन्ना भाई एमबीबीएस’मधील डॉक्टर अस्थानाची प्रत्येक भूमिका त्यांनी सशक्तपणे साकारली. आज बोमन इराणी यांचा वाढदिवस आहे. वाढदिवसाच्या निमित्ताने आपण बोमन इराणी यांच्याशी संबंधित एक रंजक गोष्ट सांगणार आहोत.
बोमन इराणी यांचा जन्म 2 डिसेंबर 1959 रोजी मुंबईत झाला. बोमन यांनी वयाच्या 42 व्या वर्षी अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवले. त्याआधी हॉटेलमध्ये वेटर ते रस्त्यावर फोटो विकण्याचे कामही त्यांनी केले. अभिनय क्षेत्रात येण्याआधी बोमन मुंबईच्या ताज हॉटेलमध्ये वेटर आणि रुम सर्व्हिस बॉयचे काम करत असत. दोन वर्षे त्यांनी हे काम केले. यानंतर काही कौटुंबिक कारणाने त्यांनी वेटरची ही नोकरी सोडली व कुटुंबाच्या व्यवसाय सांभाळणे सुरु केले. पण या व्यवसायात फार काळ त्यांचे मन रमले नाही. इकडची त्यांची ओळख श्यामक दावरसोबत झाली.
या भेटीनंतर श्यामक यांनी बोमन यांना थिएटरमध्ये काम करण्याचा सल्ला दिला आणि बोमन इराणी थिएटरमध्ये काम करू लागले. बोमन यांनी हळू हळू थिएटरमध्ये आपली ओळख निर्माण केली. 2001 मध्ये त्यांना 'अॅव्हर्डीज सेम्स मी ललित' आणि 'लेट्स टॉक' असे दोन इंग्रजी चित्रपट मिळाले. या चित्रपटांनंतर त्यांची बॉलिवूडमध्ये एन्ट्री झाली. त्याने 'डर माना है' आणि 'बूम' या चित्रपटात भूमिका केल्या. पण 2003 मध्ये आलेल्या 'मुन्नाभाई एमबीबीएस' चित्रपटापासून त्यांना ओळख मिळाली. या चित्रपटात त्यांनी साकारलेली डॉक्टर अस्थानाची भूमिका खूप आवडली. यानंतर 'लक्ष्या', 'वीर-जारा', 'पेज -3', 'नो एंट्री' सारख्या अनेक सिनेमे त्यांनी केले.
थ्री इडियट्स या चित्रपटाने बोमन इराणी यांच्या कारकिर्दीला एक नवी उंची दिली. वयाच्या 42 व्या वर्षी चित्रपटांतून पदार्पण केलेल्या बोमनने आतापर्यंत 50 हून अधिक चित्रपट केले आहेत.