Birthday Special : ‘धक धक गर्ल’ माधुरी दीक्षितला ‘त्या’ सीनचा आहे पश्चाताप!
By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2017 5:13 AM
बॉलिवूडची ‘धक धक गर्ल’ माधुरी दीक्षित हिचा आज (१५ मे) वाढदिवस. बॉलिवूडची सर्वाधिक सुंदर अभिनेत्री अशीच माधुरीची ओळख राहिली ...
बॉलिवूडची ‘धक धक गर्ल’ माधुरी दीक्षित हिचा आज (१५ मे) वाढदिवस. बॉलिवूडची सर्वाधिक सुंदर अभिनेत्री अशीच माधुरीची ओळख राहिली आहे. माधुरीने बॉलिवूडमध्ये आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे. ती अनेक अभिनेत्रींची आयकॉन झाली आहे. ८०-९० च्या दशकात नृत्य आणि स्वाभाविक अभिनयाच्या जोरावर तिने आपली छाप पाडली. खरे तर लहानपणापासून माधुरीला डॉक्टर होण्याची इच्छा होती. मात्र नियतीला काही वेगळेच मान्य होते. ती अभिनयाच्या वाटेवर आली. माधुरीने १९८४ मध्ये राजश्री प्रॉडक्शनच्या ‘अबोध’या सिनेमातून बॉलिवूड डेब्यू केले. १९९० मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘दिल’ या सिनेमासाठी तिला दमदार अभिनयाचा फिल्म पहिला फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. अभिनेता अनिल कपूरसोबत माधुरी दीक्षितची जोडी खूपच लोकप्रीय झाली होती. अनिल-माधुरीच्या जोडीने त्याकाळी ‘तेजाब’, ‘परिंदा’, ‘राम-लखन’,‘किशन कन्हैया’, ‘जीवन एक संघर्ष ’, ‘जमाई राजा’,‘बेटा’, ‘जिंदगी एक जुआ’,‘राजकुमार’, ‘पुकार’ हे हिट सिनेमे दिले. माधुरी दीक्षितला आतापर्यंत पाच वेळा फिल्मफेअर पुरस्कार मिळाले. त्याशिवाय भारतीय सिनेमातील अपूर्व योगदानाबद्दल २००८ मध्ये तिला पद्मभूषण पुरस्काराने गौरविले गेले. माधुरी दीक्षितने तिच्या सिने करियरमध्ये ७० सिनेमातून काम केले आहे. लग्नानंतर तिने ‘गुलाब गँग’ आणि ‘डेढ़ इश्किया’ या सिनेमातून कमबॅक केले. ९० च्या दशकात माधुरी दीक्षितचे सिने करिअर चर्चेत राहिले तसेच तिची लव्हस्टोरीही चर्चेत राहिली. १९९१ मध्ये माधुरीने संजय दत्तसोबत स्क्रिन शेअर केली. ‘साजन’ या चित्रपटात हे दोघे एकत्र दिसले. याच चित्रपटाच्या सेटवर माधुरी व संजय दत्त जवळ आल्याचे बोलले जाते. संजय व माधुरी एकमेकांवर प्रेम करत होते. लग्नही करू इच्छित होते. पण माधुरीच्या वडिलांना हे नाते मान्य नव्हते. संजय आधीच विवाहीत होतो. त्यामुळे माधुरीच्या वडिलांनी या लग्नाला प्रखर विरोध केला. माधुरी व संजय या दोघांची आॅनस्क्रीन केमिस्ट्री लोकांना प्रचंड भावली होती. ‘थानेदार’,‘खलनायक’ या चित्रपटात दोघे एकत्र दिसले होते. संजय व माधुरीचे प्रेम बहरत असताना अचानक संजयला आर्म्स अॅक्टअंतर्गत अटक झाली. तो सुमारे १६ महिने तुरुंगात राहिला. या काळात माधुरी एकदाही त्याला भेटायला तुरुंगात गेली नाही. यानंतर संजय तुरुंगातून बाहेर आला. तरीही माधुरी त्याला भेटली नाही. यामुळे नाराज संजयने यानंतर माधुरीसोबत चित्रपटांत काम करण्यास नकार दिला होता. यानंतर १९९९ मध्ये माधुरीने डॉक्टर श्रीराम नेने याच्याशी लग्न केले. २०१६ मध्ये आपली उर्वरित शिक्षा पूर्ण करून संजय तुरुंगातून बाहेर आला. दिग्दर्शक राजकुमार हिरानी यांनी संजयच्या आयुष्यावर बायोपिक बनवण्याची इच्छा व्यक्त केली. संजयनेही याला होकार दिला. ही गोष्ट माधुरीला कळली तेव्हा तिने २५ वर्षांनंतर संजयला फोन केला. संजयच्या बायोपिकमध्ये तिच्या व संजयच्या प्रेमकथेचा उल्लेख येता कामा नये, अशी गळ तिने संजयला घातल्याचे कळते. ‘दयावान’ या चित्रपटानंतर माधुरी अचानक चर्चेत आली. १९८८ मध्ये आलेल्या या चित्रपटात २१ वर्षांच्या माधुरीने स्वत:पेक्षा २१ वर्षे मोठ्या अभिनेत्यासोबत किस सीन दिला होता. हा अभिनेता होता विनोद खन्ना. माधुरीच्या या किस सीनवर प्रचंड टीका झाली होती. ‘दयावान’च्या रिलीजनंतर माधुरीने अनेकदा या किस सीनचा पश्चाताप होत असल्याचा खुलासा केला होता. हा सीन मी करायला नको होता. पण तुम्ही एखाद्या सीनला नाही म्हणू शकता, हे तेव्हा मला ठाऊक नव्हते. कारण मी इंडस्ट्रीत नवे होते, असे माधुरी म्हणाली होती.