Join us

Birthday Special: दिलीप कुमार @96! बनायचे होते खेळाडू, बनले अभिनेते!!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2018 10:37 AM

भारतीय सिनेसृष्टीचे ‘ट्रॅजेडी किंग’  दिलीप कुमार यांचा आज (११ डिसेंबर)वाढदिवस .भारताच्या दादासाहेब फाळके तर पाकिस्तानच्या निशान-ए-इम्तियाज या सर्वोच्च पुरस्कारांनी सन्मानित या अभिनेत्याचे भारतीय सिनेप्रेमींच्या मनात एक अढळ स्थान आहे.

भारतीय सिनेसृष्टीचे ‘ट्रॅजेडी किंग’  दिलीप कुमार यांचा आज (११ डिसेंबर)वाढदिवस .भारताच्या दादासाहेब फाळके तर पाकिस्तानच्या निशान-ए-इम्तियाज या सर्वोच्च पुरस्कारांनी सन्मानित या अभिनेत्याचे भारतीय सिनेप्रेमींच्या मनात एक अढळ स्थान आहे. दिलीप कुमार यांचे खरे नाव मुहम्मद यूसुफ खान आहे, हे सगळ्यांनाच ठाऊक आहे. पण दिलीप कुमार हे नाव धारण केले आणि  या नावाने त्यांचे आयुष्य बदलले.

  पेशावर (पाकिस्तान)मध्ये  ११ डिसेंबर १९२२ मध्ये झाला. १९३० मध्ये त्यांचे कुटुंब पेशावरहून मुंबईला आले आणि दिलीप कुमार यांचे वडील मुंबईत फळं विकू लागले.  खरे तर अभिनेता बनणे हे दिलीप कुमार यांचे स्वप्न नव्हतेच. त्यांना बनायचे होते फुटबॉल प्लेअर. शाळेत असताना दिलीप कुमार फुटबॉल खेळत. या खेळात गती असल्याने त्यांना शाळेच्या फुटबॉल असोसिएशनचा सेक्रेटरी बनवण्यात आले होते. यानंतर देशासाठी खेळण्याचे त्यांचे स्वप्न होते. पण त्यांच्या वडिलांना मात्र हे मान्य नव्हेत. त्यांनी फुटबॉलऐवजी बुद्धिबळ खेळावे, असे त्यांच्या वडिलांना वाटे.एका मुलाखतीत दिलीप कुमार यांनी याबद्दल सांगितले होते. १९ व्या वर्षांपर्यंत फुटबॉल खेळणे हेच माझे स्वप्न होते. पण नियतीने मात्र त्यांना अभिनेता बनवले.

 बॉम्बे टॉकीजचे संस्थापक हिमांशू राय यांच्या पत्नी व अभिनेत्री देविकाराणी यांच्या प्रोत्साहनानेच १९४३ मध्ये युसूफ खान याचा हिंदी चित्रपटसृष्टीत प्रवेश झाला. हिंदी लेखक भगवतीचरण वर्मा यांनी युसूफ खान याचे दिलीपकुमार असे नामकरण केले. १९४४ मध्ये बॉम्बे टॉकीज निर्मित ‘ज्वार भाटा’ या चित्रपटा पासून त्यांनी आपल्या फिल्मी करियरची सुरुवात केली. सुमारे पाच दशकांच्या  कारकिर्दीत त्यांनी सुमारे ६० वर चित्रपटांत काम केले. ‘ज्वार भाटा’ फ्लॉप झाला. पण त्यानंतर आलेला ‘जुगनू’ सुपर हिट ठरला. यानंंतर दिलीप कुमार यांनी मागे वळून पाहिले नाही. १९४८ मध्ये आलेला ‘शहीद’, ‘अनोखा प्यार’, ‘मेला’ सारख्या चित्रपटांनी त्यांना सुपर स्टार बनवले. 

१९५० मध्ये आलेल्या ‘जोगन’, ‘दीदार’ आणि ‘त्यागी’ या चित्रपटांनी त्यांना ट्रॅजेडी किंग म्हणून ओळख दिली. ७०च्या दशकात अमिताभ बच्चन सारखे कलाकार बॉलिवूड मध्ये आले होते. त्यामुळे दिलीप कुमार यांची काही चित्रपट फ्लॉप झाली. म्हणून त्यांनी पाच वर्षांचा ब्रेक घेतला होता. या ब्रेकनंतर ते ‘क्रांती’सिनेमातून परतले. यानंतर वयानुसार वाट्याला आलेल्या भूमिका त्यांनी पत्करल्या. १९९८ मध्ये आलेला ‘किला’ हा त्यांचा शेवटचा चित्रपट होय.

   सर्वाधिक पुरस्कार आपल्या नावी करणा-या दिलीप साहेबांच्या नावाची नोंद गिनीज बुक आॅफ रेकॉर्ड्समध्ये नोंदवले गेले आहे. आपल्या जीवनात दिलीप साहेबांनी तब्बल आठ वेळा सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा फिल्म फेअर पुरस्कार मिळवला होता. हा कितीर्मान अद्याप कुणीही मोडू शकलेला नाहीये. ‘दाग’, ‘अंदाज’, ‘देवदास’, ‘नया दौर’, ‘कोहिनूर’,‘लीडर, राम और श्याम , ‘शक्ती’ या चित्रपटांसाठी त्यांना आठ फिल्म फेअर पुरस्काराने गौरविण्यात आले. सलग चार फिल्म फेअर जिंकणारे बॉलिवूडचे ते पहिले अभिनेते ठरले.   चित्रपट क्षेत्रातील त्यांचे योगदान पाहता भारत सरकारने १९९१मध्ये त्यांना पद्मभूषण पुरस्काराने गौरविले. २०१५ मध्ये पद्म विभूषण देऊन त्यांना गौरन्वित करण्यात आले. १९९४मध्ये सिने जगतातील सर्वश्रेष्ठ  दादासाहेब फाळके पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले.  १९९७ मध्ये पाकिस्तान सरकारने देखील त्यांना पाकिस्तानातील सर्वोच पुरस्कार निशान-ए-इम्तिआज देऊन सम्मानित केले आहे.

टॅग्स :दिलीप कुमार